मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाचे काय?; दोन्ही बाजूंचे आमदार विधानसभेत आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 08:00 IST2023-03-26T07:59:56+5:302023-03-26T08:00:02+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पार पडलेल्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाबाबत चर्चा करण्यात आली होती.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाचे काय?; दोन्ही बाजूंचे आमदार विधानसभेत आक्रमक
मुंबई : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले तरी अद्याप ते साजरे करण्याविषयी सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही याबद्दल दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी शनिवारी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर या वर्षात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन राज्य सरकारकडून नक्कीच केले जाईल व त्यासाठी निधीही देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
हे वर्ष साजरे करण्यासंदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लावून धरली. भाजपचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बागडे आणि अभिमन्यू पवार यांनीही तशीच मागणी केली. केवळ हे वर्ष साजरे करण्यावरच सरकारने थांबू नये तर विशेष बाब म्हणून मराठवाड्याला या निमित्ताने विकासासाठीचे विशेष पॅकेज द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पार पडलेल्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाबाबत चर्चा करण्यात आली होती. यासंदर्भात प्रस्ताव आणण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले होते. कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडून अधिवेशनात न आणल्याने अशोक चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला. तर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने उरले तरी सरकार याबाबत गंभीर नाही. तरी सरकारने या विषयी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.
सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे? हे स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे या विषयावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी दोघांनी केली. त्यावर पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात ठराव आणला जाईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.