कुर्ल्यात ८० लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त; वन विभाग, एटीएसने केली गुजरातच्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:00 IST2025-12-22T11:00:17+5:302025-12-22T11:00:27+5:30
उल्टीचा २७ ग्रॅमचा नमुना रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे.

कुर्ल्यात ८० लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त; वन विभाग, एटीएसने केली गुजरातच्या तरुणाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि वन विभागाने संयुक्त कारवाईत ८० लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी कुर्ला पश्चिम परिसरातून जप्त केली. गुजरातहून मुंबईत या उलटीचा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
वन विभागाचे कर्मचारी महेंद्र गिते हे शनिवारी रात्री उशिराने गस्त घालत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डगळे यांच्या आदेशानुसार कुर्ला येथे मदतीसाठी दाखल झाले. कुर्ला पोलिस ठाण्याचे ‘एटीएस’चे पोलिस उपनिरीक्षक श्रीराम घोलप यांनी एका संशयित व्यक्तीकडे व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ आढळल्याची माहिती दिली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाचे नाव विष्णूभाई राजूभाई मकवाना (२८) असून, तो गुजरातच्या अहमदाबादचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून व्हेल माशाची ६२७ ग्रॅम वजनाची उलटी जप्त करण्यात आली आहे.
बाजारभावानुसार त्याची अंदाजे किंमत ८० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी २७ ग्रॅम नमुना रासायनिक तपासणीसाठी राखून उर्वरित ६०१ ग्रॅम पदार्थ सीलबंद करण्यात आला.