‘बिगरभाडे’ दुप्पट करण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:28 IST2026-03-13T10:27:58+5:302026-03-13T10:28:12+5:30
पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षामध्ये तिकीट विक्रीव्यतिरिक्त मिळालेल्या (बिगरभाडे) महसुलामधून ११७ कोटी रुपये मिळवले आहेत.

‘बिगरभाडे’ दुप्पट करण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्धार
मुंबई : पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षामध्ये तिकीट विक्रीव्यतिरिक्त मिळालेल्या (बिगरभाडे) महसुलामधून ११७ कोटी रुपये मिळवले आहेत. येत्या आर्थिक वर्षासाठी हे लक्ष्य दुप्पट करत २३९.२४ कोटींचे ठेवले आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या भाड्याव्यतिरिक्त महसूल (नॉन-फेअर रेव्हेन्यू) वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेचा बिगरभाडे महसूल वाढविण्याच्या निर्देशांनुसार पश्चिम रेल्वेने हा महसूल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक तरुण जैन यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांची बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत महसूल वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थानकांवरील उपलब्ध जागांचा व्यावसायिक वापर, ब्रँडेड किऑस्क आणि अनुभव केंद्रे उभारणे, गर्दीच्या स्थानकांवर डिजिटल आउट-ऑफ-होम जाहिरातींचा विस्तार करणे तसेच रेल्वे स्थानके आधुनिक व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित करणे यासारख्या नावीन्यपूर्ण कल्पनांवर बैठकीत चर्चा झाली.
मुंबई सेंट्रल येथील डिजिटल लाउंज, रतलाम स्थानकावरील मिनी मॉल आणि अहमदाबाद येथील एसी-कम-डिजिटल लाउंज या उपक्रमांना प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांमुळे प्रवाशांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध होत आहेत. भारतीय रेल्वेचा बिगरभाडे महसूल ७५० कोटींवरून १,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी २३९.२४ कोटींचे लक्ष्य निश्चित केल्याचे जैन म्हणाले.