Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेंडू काढायला गेला अन् घात झाला! बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे मालाडच्या ८ वर्षीय चिमुकल्याने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:27 IST

खेळताना खड्ड्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या ८ वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मुंबईतील मालाड पूर्व भागात गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळताना खड्ड्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या ८ वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मालाड परिसरात शोककळा पसरली असून, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेजमधील आंबेवाडी परिसरात ही घटना घडली. ८ वर्षांचा दिव्यांश राजेश मौर्य हा गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास आपल्या मित्रांसोबत घराबाहेर खेळत होता. खेळता खेळता त्याचा चेंडू जवळच असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या खड्ड्यात गेला. हा खड्डा 'माउली कन्स्ट्रक्शन'च्या माध्यमातून इमारतीच्या पायासाठी खोदण्यात आला होता आणि त्यात सांडपाणी साचले होते. आपला चेंडू काढण्यासाठी दिव्यांश या खड्ड्यात उतरला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोलवर गेला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

बिल्डरचा निष्काळजीपणा

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कन्स्ट्रक्शन साईटवर सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले गेले नव्हते. खड्ड्याच्या भोवती ना बॅरिकेडिंग होते, ना तिथे सुरक्षेसाठी कोणताही सुरक्षारक्षक तैनात होता. इतकेच नाही तर तिथे कोणताही धोक्याचा फलकही लावण्यात आला नव्हता. बिल्डरच्या या बेजबाबदारपणामुळेच एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

घटनेनंतर दिव्यांशला तातडीने बाहेर काढून कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही बातमी समजताच दिव्यांशच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एका हसत्या-खेळत्या कुटुंबातील दिवा विझल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू

या प्रकरणी कुरार व्हिलेज पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डर आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पोलीस आता त्या ठिकाणी सुरक्षेचे काय नियम होते आणि कुणाच्या चुकीमुळे हा जीव गेला, याचा तपास करत असून लवकरच कारवाईचे संकेत दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Malad Tragedy: Boy Dies Retrieving Ball, Builder Negligence Alleged

Web Summary : An 8-year-old boy in Malad died after falling into a water-filled pit on a construction site while retrieving a ball. Locals allege negligence by the builder, citing a lack of safety measures. Police are investigating the incident.
टॅग्स :अपघातमुंबईमृत्यू