कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी हरपला, उत्तम वक्ते, लेखक म्हणूनही ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 03:27 AM2019-11-09T03:27:08+5:302019-11-09T03:27:35+5:30

अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच १९६४ मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली

A well-respected police officer, Harpala, a good speaker, also known as a writer | कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी हरपला, उत्तम वक्ते, लेखक म्हणूनही ओळख

कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी हरपला, उत्तम वक्ते, लेखक म्हणूनही ओळख

googlenewsNext

मुंबई : राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. कडक शिस्तीपेक्षा प्रेमाच्या चार शब्दांनी सर्वांना आपलेसे करणाऱ्या इनामदार यांच्या निधनाने पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. इनामदार यांचा जन्म सांगलीच्या तडसर गावी झाला. ते १ आॅक्टोबर १९९७ ते ५ जानेवारी २००० पर्यंत राज्याचे पोलीस संचालक म्हणून कार्यरत होते.

अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच १९६४ मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली. १९७६ मध्ये नागपूर येथे गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी नक्षलवादी चळवळीचा कुप्रसिद्ध म्होरक्या कोडापल्ली सीतारामैया याला बेड्या ठोकल्या. दोनशेहून अधिक व्यक्तींची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. तेथील धडाकेबाज कामगिरीनंतर मुंबई गुन्हे विभागाच्या सह पोलीस आयुक्तपदाची सूत्रे १९८७ मध्ये त्यांच्या हाती आली. त्यांनी येथील माफियांविरुद्ध धडक कारवाई केली. त्यांच्यामुळेच गुन्हेगारी जगतावर दरारा निर्माण करणारा ‘टाडा’ कायदा महाराष्ट्रात प्रथमच लागू करता आला. या कायद्यामुळे संघटित गुन्हेगारी आणि माफिया यांना वेसण घालता आली.

१९९१ मध्ये पुन्हा एकदा नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली. वादग्रस्त बाबरी ढांचा पाडल्यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लीम दंगलींचा वणवा भडकला असताना नागपुरात त्यांनी चोख सुव्यवस्था सांभाळली. याच दरम्यान महाराष्ट्राला हादरवून सोडणारे जळगाव-परभणी सेक्स स्कॅण्डल त्यांनी उजेडात आणले होते. पोलीस महासंचालक पदावर असताना त्यांनी राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची २२ हजार पदे निर्माण केली. अशा रीतीने पोलीस पदे निर्माण होणे हा एक देशातील विक्रमच मानला जातो.
इनामदार यांनी महासंचालक गृहनिर्माण, महासंचालक लाचलुचपत विभाग ते महाराष्ट्र पोलीस महासंचालक असा प्रवास करताना पोलीस दलाची जनमानसात प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले. कधीही कुणापुढे ते झुकले नाहीत. याची किंमत त्यांना अनेकदा मोजावी लागली. ३६ वर्षांच्या सेवेत चक्क २९ वेळा त्यांना बदल्यांना सामोरे जावे लागले. पण त्यांनी आपल्या प्रतिमेला तसेच कर्तव्यनिष्ठेला कधीही तडा जाऊ दिला नाही. अशा परिस्थितीतही बजावलेल्या प्रामाणिक, धाडसी सेवेमुळे त्यांना उल्लेखनीय व विशेष सेवेबाबतची दोन्ही राष्ट्रपती पदके सन्मानाने प्रदान करण्यात आली. बदली आणि नियुक्तीच्या वादातून सत्ताधाºयांशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी सेवानिवृत्तीच्या निरोपाची प्रतीक्षा न करता एक वर्ष आधीच राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली.



साहित्याशी जवळीक
नकळत्या वयातच त्यांच्या आईने त्यांच्याकडून भगवत्गीतेचे श्लोक पठण करून घेतले होते. लहानपणी झालेले संस्कार इनामदार यांनी कायम जपले. पोलीस खात्यासारख्या रूक्ष खात्यात काम करत असताना त्यांनी साहित्याशी जवळीक कायम जपली. विविध विषयांवरील सुमारे तीन हजार पुस्तके त्यांनी संग्रहित केली आहेत. पोलीस दलात सेवा बजावत असतानाही त्यांनी सामाजिकच नव्हे, तर पर्यावरणाच्या दृष्टीने वातावरण निकोप राहावे यासाठीही लक्ष दिले. आतापर्यंत त्यांनी वृक्षारोपण मोहिमेनुसार आठ लाखांहून अधिक झाडे लावली आहेत.

पोलिसांसाठी सुरू केले पुरस्कार
आयुष्यभर साहित्यिकांच्या वर्तुळात वावरणारे इनामदार हे कर्तव्यातही तितकेच कठोर होते. सेवेत असताना प्रामाणिक आणि पारदर्शकपणे कर्तव्य बजावणाºया निवृत्त पोलिसांविषययी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अरविंद इनामदार फाउंडेशनद्वारे पोलिसांसाठी २०१५ पासून ‘जीवनगौरव पुरस्कार’ सुरू केले.

दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी
एक प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ तितकेच साधे व्यक्तिमत्त्व इनामदार यांचे होते. कामाबरोबर त्यांनी नेहमीच सामान्यांसोबत एक अतूट नाते तयार केले. पोलिसांच्या कामासाठीही त्यांचा नेहमीच पुढाकार असे. ते माझ्या खूप जवळचे, माझे चांगले मित्र होते. सकाळी विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या निधनाची बातमी कानावार पडली आणि धक्का बसला. विशेष म्हणजे आमच्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरला होता. त्यांना या नोव्हेंबरला ७९ वर्षे पूर्ण होणार होती. काही वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्याने ते एकटेच राहत होते.
- पी. एस. पसरिचा, माजी पोलीस महासंचालक


कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला
अरविंद इनामदार यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेने आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अखंड महाराष्ट्राच्या मनावर उमटवला. त्यांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
- संजय बर्वे, मुंबई पोलीस आयुक्त

गुन्हेगारांचा कर्दनकाळ हरपला
अरविंद इनामदार म्हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळ. मुंबईसह राज्याच्या सर्व भागांत त्यांनी काम केले होते. स्पष्टवक्ता म्हणून ते प्रसिद्ध होते. सामान्य माणसाला ते नेहमी उपलब्ध असत व त्याच्या अडीअडचणी सोडवण्यात ते पुढाकार घेत असत. निवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात हिरिरिने भाग घेत. पोलिसांच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी, प्रशिक्षण व इतर सोईसवलती सुधारून मिळाव्यात यासाठी ते सतत आग्रही असत. त्यांच्या निधनाने पोलीस दलाच्या हितासाठी काम करणाºया उत्कृष्ट पोलीस अधिकाºयाला महाराष्ट्र मुकला आहे.
- प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक

संवेदनशील माणूस
रक्ताच्या कर्करोगामुळे इनामदार यांचा मत्यू झाला. ते नेहमीच सामान्यांसाठी झगडत असत. पोलीस दलात कार्यरत असले तरी इनामदार हे मनाने अतिशय संवेदनशील होते. पोलीस कर्मचाºयांना विशेष सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. ते कधी कुणापुढे झुकले नाहीत. चुकीच्या गोष्टींना नेहमीच विरोध केला. यासाठी त्यांनी नोकरीही सोडली. जर ते आता दिल्लीचे पोलीस आयुक्त असते तर, दिल्लीचे चित्र वेगळे असते. त्यांच्यासारखा कर्तव्यनिष्ठ अधिकारी आता होणे नाही.
- ज्युलिओ रिबेरो, माजी पोलीस आयुक्त
कर्तव्यदक्ष अधिकारी
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील चुकीच्या गोष्टींना विरोध केला. प्रामाणिकपणे काम करणे हे त्यांचे धोरण होते. चांगल्या लोकांना एकत्र घेत वाईटांविरुद्ध लढा, असे ते नेहमीच सांगत असत. प्रत्येक भेटीत याची ते आठवण करून देत.
- वाय. पी. सिंग, माजी पोलीस अधिकारी

उत्तम वक्ते, लेखक म्हणूनही ओळख
एक प्रामाणिक आणि न्यायप्रिय कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य व चुकीच्या गोष्टींवर हल्ला चढवला. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र असलेल्या ‘दक्षता’ मासिकाचे संस्थापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे योगदान दिले. गुन्हेगारीविषयक सत्यकथा व गूढकथांमुळे दक्षता मासिकाने एक वेगळी उंची गाठली. त्यामुळे अनेक पोलिसांनी लिहिण्यासाठी पुढाकार घेतला. उत्तम लेखक आणि वक्ते म्हणूनही ते ओळखले जात. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत. - नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

Web Title: A well-respected police officer, Harpala, a good speaker, also known as a writer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.