तलवारीने वेलकम; मंत्री गायकवाड अन् पालकमंत्री शेख अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:52 IST2022-03-29T07:52:30+5:302022-03-29T07:52:55+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वांद्रेच्या रंगशारदा हॉलमध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

तलवारीने वेलकम; मंत्री गायकवाड अन् पालकमंत्री शेख अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्लीतील नेत्याच्या वेलकमसाठी वांद्रेतील जाहीर कार्यक्रमात हातात तलवारी घेतल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, तसेच पालकमंत्री अस्लम शेख हे अडचणीत सापडले आहेत. या कार्यक्रमाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांचेही नाव दखलपात्रमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वांद्रेच्या रंगशारदा हॉलमध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दिल्लीतून आलेल्या प्रतापगढी यांचे स्वागत करताना शेख, गायकवाड तसेच प्रतापगढी यांनी हातात तलवारी घेऊन त्या हवेत फिरवल्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत कारवाईची मागणी केली. त्यानुसार
सोमवारी याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे अधिकृत पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावरून आलेले फोटो न्यायालयात ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे पोलीस व्हायरल फोटोंचे सत्य पडताळून पाहत आहेत.