वजन कमी करण्याची गोळी येणार; नव्या वर्षात आरोग्यसेवांचा होणार विस्तार; नागरिकांमध्ये उत्सुकता
By संतोष आंधळे | Updated: January 1, 2025 08:09 IST2025-01-01T08:07:57+5:302025-01-01T08:09:09+5:30
लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाबाचा विकार, हृदयविकार, गुडघेदुखी यांसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नव्या वर्षात फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन्स बाजारात आणणार आहे.

वजन कमी करण्याची गोळी येणार; नव्या वर्षात आरोग्यसेवांचा होणार विस्तार; नागरिकांमध्ये उत्सुकता
संतोष आंधळे
मुंबई : नवे वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी कलाटणी देणारे ठरणार आहे. खासगी रुग्णालयांबरोबरच महापालिका आणि शासनाच्या अखत्यारीतील बहुसंख्य रुग्णालयांत पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, खासगी फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन अधिकृतरीत्या बाजारात आणणार आहेत. या औषधांबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाबाचा विकार, हृदयविकार, गुडघेदुखी यांसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नव्या वर्षात फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन्स बाजारात आणणार आहे.
रोबोट करणार शस्त्रक्रिया
रोबोटिक सर्जरी हा खर्चीक प्रकार आहे. सामान्य रुग्णांना तो परवडणारा नाही. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. परंतु, या शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना परवडाव्यात, यासाठी आता जे. जे.मध्ये त्यांची सुरुवात नवीन वर्षात केली जाणार आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने रोबोही घेतला आहे. त्यासाठी ३२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
जे. जे. होणार सुपरस्पेशालिटी
जे. जे. रुग्णालय परिसरात सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यातील काही भाग नव्या वर्षात सुरू होणार आहेत. दोन मजली तळघरासह, तळमजला अधिक दहा मजले, अशी ही इमारत असेल. प्रत्येक मजला एक लाख चौरस फुटांचा आहे. इमारतीला ए, बी, सी, डी अशा चार विंग असतील. त्यापैकी दोन विंग नव्या वर्षात कार्यान्वित होतील. त्यामुळे रुग्णालयातील बेडची संख्या २,३५० इतकी होणार आहे.
डिजिटल रुग्णनोंदणी
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील २५ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत रुग्णांची माहिती हाताने लिहिली जाते. कॉलेजना कॉम्प्युटर दिले. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले लोकल एरिया नेटवर्क, इंटरनेट आणि डेटा ऑपरेटर नसल्याने रुग्णालयांतील डिजिटल रुग्ण नोंदणी दूरच आहे. ती नव्या वर्षात सुरू होणार असल्याचे विभागाने सांगितले.
आयव्हीएफ सेंटर
खासगी रुग्णालयांत आयव्हीएफ उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. हा खर्च आता काही हजारांच्या घरात येईल. महापालिकेच्या अखत्यारीतील सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारण्यात आले असून, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ते सुरू होणार आहे. कामा रुग्णालयातही याच वर्षी आयव्हीएफ उपचार सुरू होणार आहेत.