Join us

"महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविणार", उदय सामंत यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 15:32 IST

Uday Samant News: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी येत्या 7 ते 8 दिवसांत व्यापक लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी येत्या 7 ते 8 दिवसांत व्यापक लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. बुधवारी मुंबईच्या सिडनॅहम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या मोहिमेतून राज्याच्या प्रत्येक महाविद्यालयात तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान सध्यस्थीतीत ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे 2 डोस पूर्ण केले आहेत त्यांनी सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी असे आवाहन केले आहे.महाविद्यालयानाही विद्यार्थी पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. विद्यापीठांची वसतिगृहे ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून दिवाळीनंतर ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन , ऑफलाईन परीक्षा , कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी व प्रचार्यांचा सत्कार करण्यात आला. सिडनॅहम प्राचार्या महाविद्यालयाच्या प्राचार्य माधुरी कागलकर यांच्या हस्ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालिका डॉ सोनाली रोडे याही उपस्थित होत्या. दरम्यान दिवसभरात आणखी काही महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थी सुरक्षिततेची काय तयारी महाविद्यालयांनी केली आहे याची पाहणी आपण करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :उदय सामंतमहाराष्ट्र सरकार