Join us

“लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडू”; आदिती तटकरेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 05:49 IST

महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणीला दरमहा २१०० दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, ते चालू अधिवेशन किंवा या अर्थसंकल्पापासून दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेसाठी २१०० रुपयांचा हप्ता सुरू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यामधून दिले होते. हा जाहीरनामा पाच वर्षांसाठी असला तरी मंत्रिमंडळासमोर त्याबाबत प्रस्ताव ठेवून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत आ. अनिल परब, आ. सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

नमो शेतकरी आणि लाडकी बहीण अशा दोन सरकारी योजनांचा लाभ घेऊन अनेक महिलांनी सरकारची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर सरकार कारवाई करणार का? हा लाभ घेऊ देणाऱ्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या निधीचा अपव्यय केला असून, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी आ. अनिल परब यांनी केली.

मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देताना, योजना सुरू करताना महिलांकडून अन्य योजनांचा लाभ घेत नसल्याचे स्वघोषणापत्र भरून घेतले होते असे सांगितले. हा निकष आजही कायम आहे. अन्य योजनांच्या लाभार्थ्यांची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर छाननीदरम्यान काही अर्ज बाद करण्यात आले, असेही त्या म्हणाल्या. 

मुख्यमंत्री म्हणाले होते...

महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणीला दरमहा २१०० दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, ते चालू अधिवेशन किंवा या अर्थसंकल्पापासून दिले जाईल. त्याची तरतूद केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नाही, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :लाडकी बहीण योजनाअदिती तटकरेमहायुतीविधान परिषद