ससून डॉकच्या कोळी, मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू; मंत्री नितेश राणेंना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 01:01 IST2025-07-15T01:01:02+5:302025-07-15T01:01:30+5:30
ससून डॉकच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचीही केली घोषणा

ससून डॉकच्या कोळी, मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू; मंत्री नितेश राणेंना विश्वास
मुंबईवर पहिला अधिकार कोळी समाजाचा, मच्छिमार बांधवांचा आहे. त्यामुळे कोणत्याही मच्छीमार बांधवाला हक्कांपासून आमचे शासन वंचित ठेवणार नाही. मी स्वतः ससून डॉक परिसरात जाऊन त्या भागातील स्थिती पाहिली आहे. मच्छीमार ज्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी गळणाऱ्या छपराचे नूतनीकरण केले आहे. पावसाळ्यात पाणी येणार नाही, असे छप्पर आता बांधण्यात आले आहे. आणखीन ऑक्शन हॉल व शौचालये नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. ससून डॉक येथील कोळी व मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वास मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधान परिषदेत दिला. ससून डॉक संदर्भातील परिषद सदस्यांच्या लक्षवेधी सूचनांवर चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
"ससून डॉक परिसरातील मच्छीमार बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळ आणि मत्स्य व्यवसाय विकास महामंडळामार्फत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, यासाठी ९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यापैकी २२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून, त्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांवर भर दिला जात आहे. या निधीतून आतापर्यंत ससून डॉक परिसरात कार्पेट, सहा आसनी चार कॅन्टीन टेबल, पंखे, सहा खुर्च्या, लाईट व मोबाईल चार्जिंग पॉईंट, पुरुष-महिला कक्षांसह दहा शौचालये (दोन युनिट्स), पिण्याच्या पाण्यासाठी एमएमसी शेड व वॉटर कुलर यांसारख्या सुविधांची उभारणी पूर्ण झाली आहे," अशी माहिती राणे यांनी दिली.
"पाळणाघर उभारणीसाठी देखील शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शेडमध्ये योग्य स्वयंसेवी संस्था नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. शिवाय, घनकचरा व्यवस्थापन, शिवभोजन योजना अशा अनेक मागण्या जय मल्हार मत्स्य उद्योग सहकारी संस्थेच्या २११ सभासदांकडून शासन दरबारी मांडण्यात आल्या आहेत. प्लास्टिक मुक्त कोळीवाडा अभियान सुद्धा ससून डॉकसह इतर ठिकाणी हाती घेतले असून, मासे विकल्यानंतर उरलेला कचरा थेट समुद्रात न टाकता, त्यासाठी वेगळा प्रकल्प राबवण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी काही खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू असून, कचरा व्यवस्थित उचलून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जाईल," असेही ते म्हणाले.
या चर्चेदरम्यान उपसभापती नीलम गोरे यांनी मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या उत्तराबद्दल समाधान व्यक्त केले. हे मंत्री खूप चांगल्या पद्धतीने उत्तरे देत असून या चर्चेतून मच्छीमारांना निश्चितच फायदा होईल. त्यामुळे भविष्यात ज्या सदस्यांना ससून डॉक संदर्भातील प्रश्न सुटावेत आणि मच्छीमारांना न्याय मिळावा असे वाटते त्यांनी या चर्चेत भाग घेऊन पुन्हा ज्यावेळी बैठक लावली जाईल, त्यावेळीही उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.