मुंबई – आजचा दिवस रक्षाबंधन, बहिणीच्या रक्षणासाठी जबाबदारी भावाची असते तसं देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीची सर्व तयारी झाली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत २६ ते २८ पक्ष सहभागी झालेत. सर्व पक्षातील सहकारी या बैठकीसाठी मेहनत घेत आहेत. याआधी २ बैठका झाल्या आता तिसरी बैठक मुंबईत होतेय. मुंबईत ही बैठक होतेय त्याचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, संताची जन्मभूमी आणि शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले.
अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईतील बैठकीचं विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राचं ऐतिहासिक वेगळेपण आहे. स्वातंत्र्य लढाईत, राजकीय क्रांती यात मुंबईचं महत्त्वाचे स्थान आहे. महागाई, बेरोजगारी यावर विरोधी पक्ष आवाज उठवत आहे. २०१९ च्या निवडणुकीत इंडिया विरोधी पक्षात जे पक्ष सहभागी झालेत त्यांना एकूण २३ कोटी ४० लाख मतदान झाले होते. तर भाजपाला त्या निवडणुकीत २२ कोटी ९० लाख मतदान झाले होते. त्यामुळे वेगवेगळे लढल्याने मतांचे विभाजन झाले त्यामुळे २२ कोटी मतदान असताना भाजपा देशात त्यांची ताकद वाढवत आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत इंडियाच्या या बैठकीत ११ मुख्यमंत्री सहभागी आहेत. मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र यासारख्या राज्यात भाजपाने फोडाफोडी करून सरकार बनवले. कर्नाटकताही भाजपाने असेच केले होते. परंतु तिथे निवडणुकीत पुन्हा लोकांनी जास्त जागा जिंकवून काँग्रेसला विजयी केले. इंडियाच्या या वातावरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सर्व राजकीय पक्ष आमच्यासोबत आहेत. कोणाला विरोध करणे हेच आमचे काम नाही. विकास करणे हादेखील आमचा अजेंडा आहे. आम्ही एकत्र ताकदीने पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. देशात द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना रोखण्याचं आव्हान आम्ही स्वीकारले आहे. सकारात्मक ध्येय ठेऊन आम्ही पुढील वाटचाल करत आहोत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आघाडीत सर्व एकत्र येत आहेत असंही अशोक चव्हाण यांनी सांगितले.