Join us  

दांड्याने दडपाल तर आम्ही हातात तिरंगा घेऊन लढू- उमर खालिद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 10:20 PM

नोटाबंदी, जीएसटी लागू करून देशाचं अर्थकारण उद्धवस्त केलं आहे.

मुंबई - दिल्लीमध्ये खरी तुकडे तुकडे गँग असून त्यांनी आधी देशाच्या अर्थव्यवस्थेचे तुकडे केले असल्याचा आरोप दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदने केला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे छात्र भारती आणि समविचारी विद्यार्थी संघटनांनी सीएए, एनआरसी, एनपीआर  विरोधी छात्र परिषद आयोजित केली होती त्यावेळी उमर खालिद बोलत होता.

नोटाबंदी, जीएसटी लागू करून देशाचं अर्थकारण उद्धवस्त केलं आहे. तसेच 2 कोटी नोकऱ्या देऊ, काळा पैसा भारतात आणू,  १५ लाख रुपये बँक खात्यात जमा करू अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेवर पडदा टाकण्यासाठी  नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हा भाजपाचा अजेंडा पुढे करण्यात येत आहे अशी टीका उमर खालिदने केला आहे. तसेच सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात देशभर असंतोष असून हा असंतोष दांड्याने दडपाल तर आम्ही हातात तिरंगा घेऊन लढू आणि जिंकू असा निर्धार देखील उमर खालिद यांनी व्यक्त केला. 

सीएए, एनआरसी, एनपीआर  विरोधी छात्र परिषदेत  उमर सोबत अलिगढ विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज, हरियाणाचे युवा नेते प्रदीप नरवाल, जेएनयुचे विद्यार्थी नेता रामा नागा, जामियाचे विद्यार्थी नेता हम्मादुररहमान, मुंबईच्या विद्यार्थी नेत्या सादिया शेख, टीस विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष भट्टा राम, छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष प्रा. रविंद्र मेढे, आमदार कपिल पाटील यांनी सहभाग घेतला होता. या परिषदेचे स्वागताध्यक्ष फारुक शेख होते, अशी माहिती परिषदेचे निमंत्रक सचिन बनसोडे यांनी दिली आहे.  

छात्र परिषदेत महाराष्ट्राच्या नव्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड परिषदेला पाठिंबा द्यायला आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात  CAA, NRC, NPR  लागू होणार नाही असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. देशभरातल्या तरूणांच्या आंदोलनाची दखल केंद्र सरकारला घ्यावीच लागेल, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मुंबईची सादिया शेख म्हणाली की, आपल्या देशात महिलांची संख्या अर्धी आहे. आमच्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही.  एनआरसीमध्ये बुरखा घालण्याच्या आमच्या ओळखीवरून जर मोदी आम्हाला लक्ष करत असतील तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो याविरोधात आम्ही आमचा आवाज बुलंद करू असं सादियाने सांगितले.

लोक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी परिषदेतल्या विद्यार्थी तरूण नेत्यांचं स्वागत केलं. देशभर हे तरूण नेते एनआरसी  आंदोलनात देत असलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कौतुक केलं. यावेळी कपिल पाटील म्हणाले, ज्यांना तुकडे तुकडे गँग म्हणून हिणवलं ते देश आणि समाज जोडण्याचं काम करत आहेत. आणि खरी तुकडे तुकडे गँग दिल्लीमध्ये खुर्चीत बसली आहे. हा विद्यार्थी तरूणांचा असंतोष वाढत जाईल आणि सत्ताधाऱ्यांना पळती भूई थोडी होईल असं कपिल पाटील यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी, युवकांच्या तुफान गर्दीत पार पडलेल्या या परिषदेच्या आयोजनामध्ये छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या पुढाकारने  JAC Mumbai, AISF, SFI, ASA, TISS Student Unions, Samyak, MASU, SIO, CYSS, PSU, AIPC, DYF, AYW, Vidhyarthi Bharati, Mumbai Graduate Forum  या समविचारी विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :उमर खालिदराष्ट्रीय राजधानी क्षेत्रनागरिकत्व सुधारणा विधेयकभारतमुंबईभाजपादिल्लीमहाराष्ट्र