कोळी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून न्याय देणार : प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:23 IST2020-01-13T17:23:15+5:302020-01-13T17:23:34+5:30
कोळी महासंघाचे चिंतन शिबीर काल कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा येथे उत्साहात संपन्न झाले.

कोळी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून न्याय देणार : प्रवीण दरेकर
मुंबई : कोळी समाजाच्या जात पडताळणी व अन्य समस्यांसंदर्भात विधानपरिषदेत आवाज उठवणार असून शासनाला जागे करण्याचे काम करणार आहोत. जर ते ऐकत नसतील तर स्वतः रस्त्यावर उतरून समाजाला न्याय देण्याचे काम करेन. आपण संपूर्ण कोळी समाजाच्या पाठीशी आहे, असे ठोस आश्वासन कोळी समाजाच्या चिंतन शिबिरात समाजाला मार्गदर्शन करताना विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिले. कोळी समाजाचे लढवय्ये आमदार रमेश पाटील यांच्या सारखे सहकारी आपल्याला लाभले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आमदार कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा विधानपरिषद आमदार रमेश पाटील व महासंघाचे युवानेते अॅड. चेतन पाटील यांनी यावेळी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
कोळी महासंघाचे चिंतन शिबीर काल कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा येथे उत्साहात संपन्न झाले. कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमातीच्या समस्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सदर चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी ही आपल्या समस्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व व आमदार रमेश पाटील यांच्यासमोर मांडल्या व त्यावर तोडगा काढण्यासाठी अभ्यास करावा, अशी विनंती करण्यात आली.
या चिंतन शिबिराला कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, ज्येष्ठ नेते रामकृष्ण केणी, उपाध्यक्ष अरुण कोळी, सचिव सतीश धडे,तसेच महाराष्ट्रातील महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव व मोठ्या संख्येने उपस्थित होते.