इतके नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल; भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान, मराठी, अमराठी वाद पेटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:08 IST2026-01-01T13:06:36+5:302026-01-01T13:08:02+5:30
कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने एकीकडे भाजपची कोंडी झाली असताना उद्धवसेना, मनसेसह शिंदेसेनेने त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

इतके नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल; भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान, मराठी, अमराठी वाद पेटला
मिरा राेड/मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना आता मराठी आणि अमराठी वाद पेटला आहे. आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल या भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मिरा भाईंदरमध्ये केलेल्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत. कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने एकीकडे भाजपची कोंडी झाली असताना उद्धवसेना, मनसेसह शिंदेसेनेने त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
बिहारच्या निवडणुकीनंतर ही नववी सार्वजनिक निवडणूक आहे. मीरा भाईंदरसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजप महायुतीची सत्ता येईल. तसेच इतके नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल, असे वक्तव्य कृपाशंकर सिंह यांनी मिरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय मोर्चाने आयोजित केलेल्या संमेलनात केले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर उद्धवसेनेचे आ. सचिन अहिर म्हणाले, हा मराठी माणसाचा अपमान आहे. आमचे इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर बनेल हे वक्तव्य म्हणजे माज आहे. तर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी, हे कधीच प्रत्यक्षात येणार नाही. मुंबई असेल वा इतर ठिकाणी मराठीच महापौर असेल. राज ठाकरे हे नेहमीच म्हणत आले आहेत की, मराठी माणूस जर वेळीच जागा झाला नाही तर मुंबई हातातून जाईल, हे आता दिसायला लागले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे याला समर्थन आहे का, असा सवाल त्यांनी केला.
भाजपचे उमेदवार
महापालिका मराठी उत्तर भारतीय इतर
मुंबई ९२ १५ ३०
ठाणे ३० २ ८
मिरा भाईंदर ३९ १४ ३४
कल्याण-डाेंबिवली ५१ २ १
उल्हासनगर ३८ १० ३०
भिवंडी २१ १ ३
या घटनेवर बाेलताना कृपाशंकर सिंह यांनी सारवासारव केली व माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला.
उद्धव-राज युतीचे ९ महापालिकेत ९०% मराठी उमेदवार -
अमित साटम म्हणतात, मिरा भाईंदरबद्दल प्लीज विचारू नका -
मिरा भाईंदरबद्दल प्लीज मला विचारू नका. मुंबईत अनेक वर्षे राहणारा मराठी बोलणारा असा प्रत्येक माणूस मराठीच आहे आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार, असे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भाजपच्या नेत्यांची हिंमत वाढली आहे. मुंबई किंवा आसपासच्या शहरांचा महापौर केवळ हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे, अशी विधाने करून ते मराठीवर प्रेम करणाऱ्या इतर भाषकांचाही अपमान करत आहेत. मतदारांनी हा प्रकार लक्षात घेतला असून, या निवडणुकीत जनता हा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही.
आ. सचिन अहिर, उद्धवसेना
आम्ही पहिल्यापासून म्हणतोय यांच्या पहिल्या यादीत २० ते २१ उमेदवार परप्रांतीय होते. त्यांना मुंबईतील परप्रांतीयांचा टक्का वाढवायचा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे. हेच सातत्याने आमचे नेते राज ठाकरे सांगत आले आहेत. ते आता समाेर येत आहे. मुंबईचा महापौर मराठीच होणार. आमचाच होणार.
अविनाश जाधव, मनसे नेते
भाजपची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंह यांना दिले असतील असे वाटत नाही. मुंबईचा महापौर ठरविण्याचे धोरण सिंह ठरवणार नाहीत. ते धोरण मुख्यमंत्री ठरवतील. असे वाद निवडणुकीच्या ताेंडावर विराेधकांकडून मुद्दाम काढले जात आहेत.
उदय सामंत, मंत्री, शिंदेसेना