Join us

Maratha Reservation: अमोल कोल्हे, सयाजी शिंदे, आ. ह. साळुंखेंशी चर्चेनंतर CMचा कायद्याचा वायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:54 IST

मराठा समाजातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावरुन निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सरकारनं आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाला निश्चित वेळेत आरक्षण देऊ, असं मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर म्हटलं. लवकरच राज्यात शांतता प्रस्थापित होईल, अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली. 'मराठा समाजातील मान्यवरांशी आज चर्चा झाली. यावेळी त्यांनी आरक्षणाविषयी अनेक सूचना सरकारला केल्या. त्या सूचनांचा सरकारकडून नक्की विचार केला जाईल. मराठा समाजाला आरक्षण दिण्याविषयी सरकार कटिबद्ध आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सरकार आरक्षणाविषयी सकारात्मक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे उपस्थित होते. या बैठकीला अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, उद्योजक भैरवनाथ ठोमरे, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, सुवर्ण कोकण संस्थचे डॉ. सतीश परब हजर होते. या बैठकीसाठी छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांनादेखील निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र या तिघांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. 58 मोर्चे काढूनही सरकारला मराठा समाजाच्या भावना समजल्या नाहीत. मग आता चर्चेचा काय उपयोग, अशी भूमिका या तिघांनी घेतली. तर या सरकारकडून केल्या जाणाऱ्या या चर्चेशी आमचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी दिली. 

टॅग्स :मराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चादेवेंद्र फडणवीसभाजपा