बोगस मतदार थोपविणार, निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू : ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 06:05 IST2025-10-28T06:05:46+5:302025-10-28T06:05:46+5:30
निवडणूक आयुक्तांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे

बोगस मतदार थोपविणार, निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू : ठाकरे
मुंबई : लोकशाहीत मतदार सरकार निवडतात. पण, आता परिस्थिती अशी आली आहे की मतदार कोण हे सरकार ठरवीत आहे. मतदार यादीचा घोळ निवडणूक आयोगाने केला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदाराला ओळखणारा पोलिंग एजंट असला पाहिजे. निवडणूक आयोगाला सांगून ते जर ऐकणार नसतील तर बोगस मतदारांना आम्हीच थोपविणार. आयोगाने या गोष्टी सुधारल्या नाही तर निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू, असा इशारा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला.
वरळीच्या एनएससीआय डोम येथे उद्धवसेनेने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा आयोजित केला होता. यावेळी उद्धव म्हणाले, एका यादीत १,२०० जणांची नावे असून, ती यादी उपशाखाप्रमुखांनी तपासावी. घरोघरी जाऊन यादीनुसार मतदार त्या घरात, इमारतीत राहतात का याची खात्री करावी. भाजप असे बोगस मतदार फिरविणार असल्याने मतदार यादीनुसार तपासणी करावीच लागेल.
आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. पण, त्यांना आत्मनिर्भर भाजपही करता आला नाही. लोक, पक्ष, मते चोरावी लागतात. पक्ष फोडावे लागतात तरीही आत्मनिर्भर ? केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत येऊन गेले. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई पालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयुक्तांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे
ईव्हीएमबाबतचा संशय अजूनही दूर झाला नसता निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट ठेवणार नाही असे जाहीर केले. मग, निवडणूक कशाची घेणार ? बोगस मतदार मतदान करून निघून जाणार. आयोग वाटेल तसा निर्णय देणार आणि आम्ही काही केल्यास करप्ट प्रॅटिक्स म्हणून आमच्यावर गुन्हा नोंदविणार. असे असेल तर मग निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवरही गुन्हा दाखल करायला हवा. निवडणूक आयुक्तांनाही सजा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
वरळीत २० हजारांहून अधिक मतदार संशयास्पद
वरळी विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला तेव्हा २० हजारांहून अधिक मतदार संशयास्पद असल्याचे दिसून आले. हा मोठा घोटाळा आहे, असा आरोप उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केला.