Join us

आम्ही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार; नरहरी झिरवळ यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:30 IST

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. 

ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या ९ झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील ९ आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदावार दावा केल्यास अंबादास दानवे यांचं पद जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. 

विधान परिषदेत ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार असल्याचे म्हटलं आहे. १०० टक्के आम्ही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करू, असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरचं विधान परिषदेतील संख्याबळ पुढील प्रमाणे आहे.

भाजपा- २२ठाकरे गट- ०९शिंदे गट- ०२राष्ट्रवादी काँग्रेस- ०९काँग्रेस- ०८अपक्षइतर- ०७एकूण रिक्त जागा- २१

टॅग्स :उद्धव ठाकरेनरहरी झिरवाळराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाअंबादास दानवे