We want to fight China, not the government's opponents, Shiv Sena's criticize bjp | आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही; शिवसेनेचा टोला

आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही; शिवसेनेचा टोला

मुंबईः लडाख सीमेवरील भारत आणि चीनच्या संघर्षामुळे सर्वच वातावरण ढवळून निघालं आहे. काँग्रेसनं चीननं केलेल्या घुसखोरीवरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत, तर मोदी सरकारनंही चीननं आमच्या भागात घुसखोरी केली नसल्याचा खुलासा केला आहे. जर चीननं आपल्या भागात घुसखोरीच केली नाही, मग २० जवानांचं बलिदान कशासाठी गेलं?, असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

'कोरोना व्हायरसशी आज संपूर्ण देश लढत आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही!' जसा या ट्यूनचा लोकांना कंटाळा आला आहे तसा चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे. 'आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही' अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी, असा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. 

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

पंतप्रधान नेहरू असतील किंवा मोदी , चीनचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे. पंडित नेहरू हे वेगळ्याच आदर्शवादाने भारून गेलेले नेते होते. 

'सत्यमेव जयते' या हिंदुस्थान सरकारच्या ब्रीदवाक्यावर त्यांची भाबडी श्रद्धा होती. पंतप्रधान मोदी यांचा आध्यात्मिक शक्ती आणि बंधुभावावर विश्वास आहे. 

संकट कितीही मोठे असले तरी हिंदुस्थानचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. 

तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही. मोदी चीनविषयी बोलतात व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है! 

कोरोना ट्यून ऐकून कानाचे पडदे बिघडले आहेत, असे काँग्रेसच्या एका आमदाराने केंद्र सरकारला कळवले आहे. मोबाईलवरील ही कॉलर ट्यून आता हटवा, असे या राजस्थानच्या आमदार महोदयांचे म्हणणे आहे. 

सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे. 

राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळाला. चीन व काँग्रेसचे नाते काय? असे प्रश्न भाजपकडून विचारण्यात आले. 

यावर काँग्रेसने प्रतिटोले मारले. पंतप्रधान केअर्स फंडला चिनी कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपये आले आहेत व सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या खात्यातही चिनी कंपन्यांकडून पैसे जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. 

म्हणजे आम्ही म्हणतोय तो मुद्दा हाच आहे. चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे. आपल्याला चीनशी लढायचे आहे हे बहुतेक सगळेच विसरलेले दिसतात. 

या सगळ्या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली आहे ती अशी की, 'देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करू नये. हे बरे नाही.'

पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो. 

चीनप्रश्नी राजकारण कोणीच करू नये. पण असे राजकारण नक्की कोण करीत आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. 

हेच प्रश्न कदाचित शरद पवार यांच्याही मनात घोळत असतील. चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग 20 जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच. 

यावर पंतप्रधानांचे ठाम उत्तर असे आहे की, ''हिंदुस्थानच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना सडेतोड आणि ठोस उत्तर मिळाले आहे.'' पंतप्रधान जे बोलले ते बरोबर आहे. 

चीनचे नाव न घेता पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या शंकेचे निरसन केले आहे. त्याच वेळी 'पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान कोरोना आणि चीनविरुद्धच्या लढाया जिंकणार आहे,' असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 

श्री. शहा यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी या दोन्ही लढायांवरच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधी पक्ष काय आदळआपट करीत आहे त्याकडे लक्ष देऊ नये. त्यांनी रोगाशी लढावे. रोग्यांशी लढून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवू नये. 

विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्न-तोफांनी इतके अस्वस्थ होण्याचे कारण नाही. 'चीनच्या मुद्यावर कोणत्याही चर्चेला घाबरत नाही. 

1962 पासून हिंदुस्थान-चीन संबंधांवर आपण संसदेत बोलायला तयार आहोत,' असे गृहमंत्री शहा यांनी जाहीर केले. खरे म्हणजे, 1962 पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय? विसरा तो भूतकाळ. 

चीनचे संकट नव्याने उसळले आहे व आपल्याला त्याच्याशी वर्तमानात सामना करून राष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे. पंडित नेहरूंनी 1962 साली चुका केल्या असतीलही, तुम्ही 1962 सालात का रांगताय? 

आता 2020 उजाडून जग पुढे गेले आहे. चीनप्रश्नी आजच्या सरकारने ठाम भूमिका घेतली हे महत्त्वाचे. पंतप्रधान नेहरू असतील किंवा मोदी, चीनचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे. 

पंडित नेहरू हे वेगळ्याच आदर्शवादाने भारून गेलेले नेते होते. 'सत्यमेव जयते' या हिंदुस्थान सरकारच्या ब्रीदवाक्यावर त्यांची भाबडी श्रद्धा होती. पंतप्रधान मोदी यांचा आध्यात्मिक शक्ती आणि बंधुभावावर विश्वास आहे. 

संकट कितीही मोठे असले तरी हिंदुस्थानचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही. 

मोदी चीनविषयी बोलतात व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है! कोरोनाप्रमाणे 'ट्यून' येथेही बदलायलाच हवी!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: We want to fight China, not the government's opponents, Shiv Sena's criticize bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.