आम्हालाच मानसोपचारांची गरज! घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 07:05 AM2019-08-15T07:05:02+5:302019-08-15T07:05:38+5:30

सायन रुग्णालयात बुधवारी मानसोपचार विभागात वेगळेच चित्र दिसून आले. या रुग्णालयातील मानसोपचार विभागाबाहेर चक्क डॉक्टरांनीच लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

We need psychotherapy! The scared doctor queens outside the psychotherapy department | आम्हालाच मानसोपचारांची गरज! घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा

आम्हालाच मानसोपचारांची गरज! घाबरलेल्या डॉक्टरांनी लावल्या मानसोपचार विभागाबाहेर रांगा

Next

मुंबई : सायन रुग्णालयात बुधवारी मानसोपचार विभागात वेगळेच चित्र दिसून आले. या रुग्णालयातील मानसोपचार विभागाबाहेर चक्क डॉक्टरांनीच लांबच लांब रांगा लावल्या होत्या. रुग्णालयातील स्थितीला कारणही तसेच होते. सायन रुग्णालयात सोमवारी संतप्त रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या निवासी डॉक्टरांनी चक्क समुपदेशनासाठी मानसोपचार विभागाबाहेर गर्दी केलेली दिसून आली. आता आम्हालाच मानसोपचारांची नितांत गरज असल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सोमवारी सायंकाळी उशिरा वॉर्डमध्ये डॉक्टर हजर नसल्याने रुग्णाचा मृत्यू ओढावला, असा आरोप करत औषध विभागाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना घेरले. जमावाने एकत्रित डॉक्टरला घेरल्याने सुरक्षारक्षकही काही करू शकले नाहीत. मात्र, या प्रसंगामुळे निवासी डॉक्टर घाबरले आहेत. सोमवारी घडलेल्या घटनेविषयी सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने सांगितले की, औषध विभागातील डॉक्टरला १२ आॅगस्ट रोजी जवळपास २५ लोकांच्या जमावाने घेरले. सुदैवाने डॉक्टर सुरक्षित आहेत. मात्र, नातेवाइकांच्या रोषाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. यामुळे निवासी डॉक्टर सुरक्षित आहे की नाही? असा सवाल सायन रुग्णालयातील मार्डचे प्रतिनिधी प्रशांत चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

निवासी डॉक्टर वैयक्तिक पातळीवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे येथील निवासी डॉक्टरांनी रुग्ण व नातेवाइकांच्या भीतिपोटी समुपदेशन घेण्याचे ठरविले आहे. प्रशासनाने चर्चा सुरू असताना, निवासी डॉक्टरांनी बुधवारी मानसोपचार विभाग २१ नंबर वॉर्डमध्ये तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. मनात हल्ल्यांविषयी भीतीने घर केल्याने सातत्याने ताण येतोय, अशी व्यथा निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली.

सुरक्षा पुरविण्यासाठी रुग्णालय प्रशासन कटिबद्ध
निवासी डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सायन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविला आहे. याखेरीज, रुग्णालय प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासनही दिले आहे. त्याचप्रमाणे, भविष्यात निवासी डॉक्टरांच्या तक्रारींचे वेळच्या वेळी निवारण करण्यात यावे, यासाठी दहा जणांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पाच निवासी डॉक्टर आणि पाच सहयोगी प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्यासाठी रुग्णालय प्रशासन कटिबद्ध आहे. - डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय.

Web Title: We need psychotherapy! The scared doctor queens outside the psychotherapy department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.