मुंबई : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मागच्या काही दशकांत व्यापारीकरण वाढले आहे तसेच यंदाच्या विसर्जनावेळी ही अनेक गणपती मंडळांची विसर्जन २० ते २२ चालले. त्यातही गिरगाव चौपाटीवर उंच पीओपीच्या गणेशमूर्ती भंग पावल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर नियमावली जाहीर करत गणेशमूर्तीची उंची १० फुटांवर मर्यादित करणे आणि पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणणे आवश्यक असल्याचे पीओपीवरील बंदीसाठी लढा देणारे मूर्तिकार वसंत राजे यांनी स्पष्ट केले.
उंच पीओपीच्या गणेशमूर्तीमुळे गणेशोत्सवाचे पावित्र्य हरवत चालले असून याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने कडक नियमावली करून त्याची अंमलबजावणी केली, तरच गणेशोत्सव पुन्हा भक्तिपूर्ण, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक होऊ शकेल शिवाय या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई व्हावी, असे त्यांनी नमूद केले.
गिरगाव चौपाटी अवशेषांचे व्हिडीओ व्हायरल
मोठ्या लाटांमुळे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर भंग पावलेल्या गणेशमूर्तीच्या अवशेषांचा खच असणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक व्हिडीओमध्ये मोठ्या गणेशमूर्ती सांभाळता न आल्याने विसर्जनापूर्वीच भंग पावत असल्याचे दिसत आहेत, असे राजे यांनी म्हटले आहे.
उपाययोजना कोणत्या?
विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या रात्री बारा वाजेपर्यंतच पूर्ण करणे बंधनकारक करावे. मिरवणुकीत फक्त पारंपरिक वाद्यांना परवानगी द्यावी.
रस्ते अडवून मंडप उभारणाऱ्या मंडळांना परवाना नाकारावा. पुण्यातील काही मंडळांचा आदर्श घेऊन मुख्य मूर्ती न विसर्जित करता फक्त पूजेची लहान मूर्ती विसर्जित करण्याचा पर्याय विचारात घ्यावा.