आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 06:07 IST2025-05-23T06:06:35+5:302025-05-23T06:07:07+5:30
महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असेच मराठी लोकांच्या मनात आहे. दोन्ही बंधू सकारात्मक आहेत. लवकरच दोन्ही नेते भेटतील, चर्चा करतील आणि पुढचे ठरवतील.

आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सगळे वाद बाजूला ठेवून मनसेसोबत यायला तयार आहोत, असे सांगितले आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा. मात्र, कोणाशी युती करायची किंवा कोणाशी नाही हा त्यांचा प्रश्न आहे, असे उद्धवसेनेचे नेते आ. अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यामुळे मनसेसोबत युतीला उद्धवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे यांना आमच्यासोबत युती झाली पाहिजे, असे वाटले. त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता त्यांनी पुढील निर्णय घ्यावा. शिंदेसेनेसोबत अथवा भाजपाबरोबर युती करून राज्याचे हित साधले जाईल, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. कोणाशी युती करायची हे मनसेप्रमुखांनी ठरवायचे आहे, असे परब म्हणाले.
मनसेच्या भावनेचा आदर केला पाहिजे - संजय राऊत
राज ठाकरे यांनी खूप महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवून समोरून आलेल्या भावनेचा आदर केला पाहिजे. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता न दाखवता भूमिका घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या, मुंबईच्या हितासाठी उचललेले पाऊल म्हणून त्याकडे पाहण्याची गरज आहे अशा सूचना केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी दिली आहे.
आम्ही तयार आहोत!
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असेच मराठी लोकांच्या मनात आहे. दोन्ही बंधू सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे यांनी चर्चेचे दार कधी बंद केले नाही. त्यामुळे लवकरच दोन्ही नेते भेटतील, चर्चा करतील आणि पुढचे ठरवतील. दोन्ही पक्षांचे नेतृत्व जो निर्णय घेतील, त्यानुसार पुढे जाण्यास आम्ही तयार आहोत, असेही अनिल परब यांनी यावेळी सांगितले.