Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही काय साधूसंत नाहीत!’ विरोधकांच्या टीकेवर अजित पवार भडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 06:35 IST

‘पेट्रोल- डिझेलवर उत्तराच्या  वेळी बोलेन’ 

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्याचे पत्रकारांनी सांगताच ते चांगलेच भडकले. मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाहीये. २००९ ते १४ पर्यंत मी ४ अर्थसंकल्प मांडले. जयंत पाटील, सुनील तटकरे यांनीही मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणे हे आमच्यासाठी नवीन नाही. अर्थसंकल्प ही काही भाजपची मक्तेदारी नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. कोरोनामुळे महसूल बुडाल्याचे सांगत केंद्राकडून अजूनही ३२ हजार कोटी आलेले नाहीत. आम्ही आमच्या बाजूने सर्व घटकांना बरोबर घेऊन अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे पवार म्हणाले. 

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केल्याचे पत्रकारांनी सांगितल्यानंतर पवार म्हणाले,  त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही काय साधूसंत नाही. जनतेला सरकारबद्दल आपलेपणाची भूमिका वाटावी, हे आमचं काम आहे. आम्ही असा कार्यक्रम देणार जो जनतेला आवडला पाहिजे. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेनं आमचा विचार केला पाहिजे. नांदेड, पुणे, ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा कार्यक्रम हे मुंबई महापालिकेत आहे का? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. 

‘पेट्रोल- डिझेलवर उत्तराच्या  वेळी बोलेन’ डिझेल-पेट्रोलवर केंद्र सरकारने कर कमी केले पाहिजेत, असे सांगून अजित पवार म्हणाले, इंधनावरील राज्याचे कर कमी करण्यासंदर्भात योग्यवेळी बोलेन.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसअर्थसंकल्प