"१९ वर्षे आम्हीही मरणयातना भोगल्या": मुंबई बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या आरोपींचे कुटुंबीय काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:19 IST2025-07-22T09:19:14+5:302025-07-22T09:19:51+5:30

या १९ वर्षांत आम्हीही मरणयातना भोगल्याचे या खटल्यात निर्दोष मुक्त केलेल्या आरोपींच्या कुटुंबांनी सांगितले. 

"We also suffered death for 19 years": What did the families of the acquitted accused in the Mumbai bomb blasts say? | "१९ वर्षे आम्हीही मरणयातना भोगल्या": मुंबई बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या आरोपींचे कुटुंबीय काय म्हणाले?

"१९ वर्षे आम्हीही मरणयातना भोगल्या": मुंबई बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या आरोपींचे कुटुंबीय काय म्हणाले?

मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई :
पोलिसांनी आमच्या भावाला पकडले. पोलिसांनी बेकायदेशीररीत्या भावाला कोठडीत ठेवले. रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. आम्हाला कधी भेटूही दिले नाही. पोलिस कधीही चौकशीसाठी घरी येत होते. या १९ वर्षांत आम्हीही मरणयातना भोगल्याचे या खटल्यात निर्दोष मुक्त केलेल्या आरोपींच्या कुटुंबांनी सांगितले. 

बॉम्ब स्फोटाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षेने निर्दोष मुक्तता केलेले डॉ.तन्वीर अन्सारी यांचे भाऊ मकसूद अहमद अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावाला पकडले, तेव्हा त्यांची पत्नी गर्भवती होती. भावाला चुकीच्या पद्धतीने लॉकअपमध्ये ठेवले. वडिलांनी त्याला बघितले, तेव्हा अंगावर जखमा आणि रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसून आला. ‘भावाने काही केले नाही’ हे ओरडून सांगितले. मात्र, आमचा आवाज कुणापर्यंत पोहोचला नाही. कोर्टातही कधी भेट झाली नाही. याच चिंतेत २००८ मध्ये आईचे निधन झाले. त्या पाठोपाठ २०१८ मध्ये वडिलांचा मृत्यू झाला. त्याची पत्नीही राजस्थानमध्ये माहेरी राहते. पोलिस कधीही घरी यायचे? हा कोण? तो कोण? असे नानाविध प्रश्न विचारून जगणे कठीण करून टाकले होते. 

निर्दोष मुक्त केलेले जमीर शेख यांचे भाऊ शरीफुल शेख (५२) यांनीही या १९ वर्षांत कुटुंब उद्धव झाल्याचे सांगितले. ते वरळीत राहतात. शेख सांगतात, आज १९ वर्षांनी आम्हाला न्याय मिळाला. मात्र, १९ वर्षांत आम्हीही भावासह आम्हीही मरणयातना भोगल्या. जमीर हे वडिलांसोबत दुकान सांभाळायचे. पोलिसांनी त्याला सुरुवातीला ४ दिवस कोठडीत ठेवले. त्यानंतर, त्याची अटक व जन्मठेपेमुळे पायाखालची जमीन सरकली होती. 
मात्र, आम्ही थांबलो नाही आमचा लढा सुरू होता. आज अखेर त्याला यश मिळाले. जमीर यांना अटक केली, तेव्हा त्यांचा मुलगा चार वर्षांचा होता. मुलाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, मुलगी शिक्षण घेत आहे. २०१० मध्ये आई आणि २०१७ मध्ये वडिलांचे निधन झाले आहे.

Web Title: "We also suffered death for 19 years": What did the families of the acquitted accused in the Mumbai bomb blasts say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.