Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्याचे फोटो आहेत', थोरातांनी भाजपला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:26 IST

राहुल गांधींच्या फोटोला भाजप नेत्यांकडून जोडे मारत विधिमंडळ पायऱ्यांवरच आंदोलन करण्यात आले.

मुंबई - राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधीमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला. त्यावरुन, काँग्रेससह विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून काँग्रेस नेत्यांनीही भाजपला जशास तसे उत्तर दिले आहे. तर, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीय... ही महाराष्ट्राची परंपरा नाहीय, असे म्हणत अजित पवार यांनीही सभागृहातच खडेबोल सुनावले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर जबरी टीका केली. 

राहुल गांधींच्या फोटोला भाजप नेत्यांकडून जोडे मारत विधिमंडळ पायऱ्यांवरच आंदोलन करण्यात आले. त्यावरुन, विरोधकांनी संताप व्यक्त केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला. रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. परंतु, विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली. तर, बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध व्य्क्त केला. तसेच, भाजप नेत्यांनाही इशारा दिला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन केले. अशा हीन पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतक-यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पाप ही झाकता येणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तसेच, आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत एवढं लक्षात ठेवा, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे सत्ताक्षाने लक्षात ठेवावे. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही, आम्हाला काय शिकवणार? अशा शब्दात थोरात यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

टॅग्स :काँग्रेसभाजपाबाळासाहेब थोरातमुंबई