'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:15 IST2025-05-01T15:59:30+5:302025-05-01T16:15:47+5:30
वेव्हज समिटमध्ये १०० देशांचे कलाकार, गुंतवणूकदार सहभागी होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
PM Modi at WAVES Summit 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’(वेव्हज २०२५) या कार्यक्रमाला संबोधित केले. या चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योगातील सर्व मोठ्या व्यक्ती एकत्र आल्या आहेत. केंद्र सरकारच्या ‘वेव्हज २०२५’साठी मुंबईत मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, आज १०० हून अधिक देशांतील कलाकार, गुंतवणूकदार आणि पॉलिसी मेकर्स मुंबईत एकाच छताखाली एकत्र आल्याचे म्हटलं. यावेळी मनोरंजन क्षेत्रासाठी पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा देखील केली.
वेव्हज पुरस्काराची घोषणा
"वेव्हज हे प्रत्येक कलाकार आणि निर्मात्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे. वेव्हज हे फक्त एक संक्षिप्त रूप नाही, तर ते संस्कृती, क्रिएटिव्हिटीची लाट आहे. या निमित्ताने, सुमारे १०० देशांमधील कलाकार, गुंतवणूकदार, पॉलिसी मेकर्स भेटतील. वेव्हजचे उद्दिष्ट मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील लोकांना एकत्र आणणे आहे. मी मीडिया उद्योगाला वेव्हज समिटला पाठिंबा देत राहण्याची विनंती करतो. भविष्यात, वेव्हज अवॉर्ड्स देखील सुरू केले जातील, हे माध्यमांमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असतील," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
स्क्रीनचा आकार लहान होत असला तरी त्याची व्याप्ती वाढतेय
"भारतातील ऑरेंज इकॉनॉमी हा उदय आहे. कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि संस्कृती हे ऑरेंज इकॉनॉमीचे तीन भाह आहेत. भारतीय चित्रपट आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. आज भारतीय चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होतात. आता परदेशी प्रेक्षकही भारतीय चित्रपट केवळ वरवर पाहता पाहत नाहीत तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आज मोठ्या संख्येने परदेशी प्रेक्षक सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात. गेल्या काही वर्षांत भारतातील ओटीटी उद्योगात १० पट वाढ झाली आहे. स्क्रीनचा आकार कदाचित लहान होत चालला असेल पण त्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतातल्या प्रत्येक गावाची एक कथा आहे
"भारतातील प्रत्येक रस्त्याची एक गोष्ट असते, प्रत्येक नदी काही ना काही गुणगुणत असते. जर तुम्ही भारतातील ६ लाखांहून अधिक गावांमध्ये गेलात तर प्रत्येक गावाची एक कथा तुम्हाला ऐकायला मिळेल आणि ती सांगण्याची त्यांची खास पद्धतसुद्धा असते. इथल्या वेगवेगळ्या समाजाने लोककथांच्या माध्यमातून त्यांचा इतिहास पुढच्या पिढीकडे सोपवण्याचे काम केले. संगीत ही येथे एक साधना देखील आहे. भजन,गझल असो, शास्त्रीय असो किंवा काही असो, प्रत्येक सुराची इथे एक कथा असते, प्रत्येक लयीला एक आत्मा असत," असं पंतप्रधान म्हणाले.
राजा हरिश्चंद्र चित्रपटाला ११२ वर्षे पूर्ण
"आज १ मे आहे. ११२ वर्षांपूर्वी, ३ मे १९१३ रोजी, भारतात राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे निर्माते दादासाहेब फाळके होते आणि काल त्यांची जयंती होती. गेल्या शतकात, भारतीय चित्रपट भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्यात यशस्वी झालाय. प्रत्येक कथा भारतीय संस्कृतीचा आवाज बनली आहे आणि जगातील कोट्यवधी लोकांच्या हृदयात तिथे स्थान मिळवलं आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.