‘मातोश्री’च्या ‘अंगणात’च पाणीटंचाई, महापालिकेचे दुर्लक्ष; वांद्रे, सांताक्रुझ, गोरेगाव, दिंडोशी, गोराईत आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:27 IST2025-07-22T13:27:07+5:302025-07-22T13:27:28+5:30
वांद्रे पूर्वेकडील कलानगर, सांताक्रुझ पूर्वेकडील गोळीबार नगर, मराठा कॉलनी या भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.

‘मातोश्री’च्या ‘अंगणात’च पाणीटंचाई, महापालिकेचे दुर्लक्ष; वांद्रे, सांताक्रुझ, गोरेगाव, दिंडोशी, गोराईत आक्रोश
मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे भरली असली, तरी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातील सोसायट्यांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वांद्रे-कलानगराबरोबरच पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ, गोरेगाव, दिंडोशी, गोराई परिसरातही नागरिक पाणीटंचाईने हैराण झाली आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही भागात नळाला पाणीच येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरातील शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मध्येही पाणीटंचाई असल्याचे समोर आले आहे.
वांद्रे पूर्वेकडील कलानगर, सांताक्रुझ पूर्वेकडील गोळीबार नगर, मराठा कॉलनी या भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. गेली तीन वर्षे नगरसेवक नसल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा वचकच राहिलेला नाही.
मुंबईत मुबलक पाणी असूनही पुरवठ्यासंदर्भात प्रशासनाकडून अपेक्षित नियोजनच झालेले नसल्याचा आरोप उद्धवसेनेचे युवासेना कार्यकारिणी सदस्य जय सरपोतदार यांनी केला. पक्षाचे आ. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यांपूर्वी या प्रश्नाबाबत सांताक्रूझ येथील एच पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक ५२ मध्ये महाराजा टॉवर गल्ली, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, कन्यापाडा या भागातही पाणीटंचाईचा मोठा प्रश्न आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी पी (दक्षिण) विभाग कार्यालयावर ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी दिली.
नागरिकांच्या मोर्चानंतरही परिस्थिती जैसे थे
त्याचप्रमाणे दिंडोशी मतदारसंघातील मालाड (पूर्व), कुरार भागातील दत्तवाडी, आनंदनगर, लक्ष्मण नगर, कोकणी नगर, शिवाजी नगर, तानाजी नगर या भागातही पाण्याअभावी नागरिकांचे खूप हाल होत आहेत.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अजित रावराणे यांच्या नेतृत्वाखाली मालाड पश्चिमच्या पी उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता.
शिवडी येथील प्रभाग २०६ मध्ये बहारी बिल्डिंग, मॉडर्न बिल्डिंग, सिद्धांचल बिल्डिंग, टी जे रोड या भागातही पाणीटंचाई असल्याचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले. धरणांत पाणी असूनही आम्हाला पाणी का मिळत नाही, असा सवाल मुंबईकरांनी केला आहे.