शहर कसले, साहेब, या भागात राहून दाखवा! रस्ता दुरुस्तीसाठी बारा महिने पत्रव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 12:05 IST2023-10-03T12:04:26+5:302023-10-03T12:05:42+5:30
मुंबईतले काही परिसर असे आहेत की, रस्त्या दुरुस्तीसाठी बारा-बारा महिने पत्रव्यवहार करूनही रस्ता बनत नाही.

शहर कसले, साहेब, या भागात राहून दाखवा! रस्ता दुरुस्तीसाठी बारा महिने पत्रव्यवहार
मुंबई :
ग्रामपंचायत, पंचायत, नगरपंचायत किंवा तत्सम ग्रामीण भागातील कार्यालयात समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिल्यावर काही प्रमाणात का होईना समस्या निकाली निघत असतील. मात्र, मुंबईतले काही परिसर असे आहेत की, रस्त्या दुरुस्तीसाठी बारा-बारा महिने पत्रव्यवहार करूनही रस्ता बनत नाही.
रात्री घराबाहेर पडण्याची भीती
विद्याविहार स्थानकावरून नवपाड्यापर्यंत रात्री १० नंतर कोणी पायी जाणार नाही, अशी अवस्था आहे. कमानी सिग्नल बैलबाजार पोलिस चौकीपर्यंतच्या अंधार असलेल्या परिसरात गर्दुल्ल्यांनी बस्तान मांडलेले असते. केवळ हेच परिसर नाहीतर कित्येक स्टेशन रोड याच पद्धतीने वाईट अवस्थेत आहेत.
हाडे खिळखिळी करणारा रस्ता
कुर्ला येथील कराची शाळेसमोरील रस्ता सिमेंट-काँक्रीटचा व्हावा, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे यासाठी आवाज उठविण्यात आला. पालिका सहकार्य करत नसल्याची खंत ॲड. राकेश पाटील यांनी व्यक्त केली. वडाळा येथील नागरी समस्यांसाठी तसेच लालबहादूर शास्त्रीनगर येथील आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या व चोरीला गेलेल्या गटाराबाबत मनसे शाखाध्यक्ष संजय बन्सी रणदिवे यांनी आवाज उठविला आहे.
याला शहराचा भाग कसे म्हणायचे?
गोवंडी, मानखुर्द या परिसरातील डम्पिंगचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून आहे तसा आहे. येथील लोक जीव मुठीत घेऊन आणि नाकतोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचे चित्र आहे.
पाणी तर विकतचेच
गोवंडी, मालाड-मालवणी, मानखुर्दमध्ये काही परिसर आजही असे आहेत की, तिकडे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. मालवणी आणि मालाड परिसरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते.
साहेब, या परिसरात राहून दाखवा
कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीच्या परिसरातील झोपड्यांत स्वच्छ शौचालये नाहीत. डासांनी तर रहिवाशांची केव्हाचीच झोप उडविली आहे. मिठीची दुर्गंधीतून नाकातून बाहेर जात, अशी अवस्था आहे. येथे महापालिकेचे ऑफिसर राहतील का? असा सवाल रहिवाशांनी केला आहे.