पाणीपट्टी वाढीच्या चर्चेला विराम; महापालिकेचा मुंबईकरांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:56 IST2026-03-25T11:56:44+5:302026-03-25T11:56:44+5:30

ना बजेटमध्ये तरतूद ना वाढीचा विचार : अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची स्पष्टोक्ती

water bill hike talks halted municipal corporation offers relief to mumbaikars | पाणीपट्टी वाढीच्या चर्चेला विराम; महापालिकेचा मुंबईकरांना दिलासा

पाणीपट्टी वाढीच्या चर्चेला विराम; महापालिकेचा मुंबईकरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पाच वर्षानंतरही पाणीपट्टीत वाढ झाली नसल्याने पाणीपट्टीत वाढ होण्याची चर्चा सुरू असली तरी, पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

पाणीपट्टीत दरवर्षी पाच टक्के वाढ होते. मात्र कोरोना काळात म्हणजे २०२० सालापासून पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. कोरोना काळ संपल्यानंतर पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता होती. परंतु वाढ झाली नाही. त्यानंतर देशात, राज्यात आणि स्थानिक पातळीवर विविध निवडणुका झाल्या. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ होऊ शकली नाही. चार वर्षानंतर मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात आले आहे. 

महापौर म्हणून पदभार स्वीकारताना महापौर तावडे यांनी, पाणीपट्टीला स्थगिती दिली जाईल, असे त्यांच्या पहिल्याच भाषणात स्पष्ट केले होते. त्यामुळे लगोलग पाणीपट्टीत वाढ होणार नाही, हे अधोरेखित झाले होते. पाणीपट्टीत सन २०२१-२२ मध्ये ५.२९ टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र नंतर वाढ केलेली नाही.

सत्ताधाऱ्यांचा टोला

पाणीपट्टीतील दरवाढीचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या पेडणेकर यांना सत्ताधाऱ्यांनी टोले लगावले. आपण ज्येष्ठ सदस्य आहात. परीक्षेला जाताना अभ्यास केला पाहिजे, जनता हवालदिल नाही; तर कोण हवालदिल झाले हे सगळ्यांना माहीत झाले आहे. पेडणेकर यांचे निवेदन राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी टीका सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली.

विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी उपस्थित केला सवाल

पालिका सभागृहाच्या आजच्या बैठकीत विरोधी पक्षनेते किशोर पेडणेकर यांनी पाणीपट्टीत वाढ होणार का, आणि झाली तर किती होणार, अशी विचारणा प्रशासनाकडे केली. तर, मुदत ठेवी मोडून प्रकल्प राबवता, मग पाणीपट्टीत वाढ का करता, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी केला. त्यावर पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही, बांगर यांनी स्पष्टपणे सांगितले.

'गारगाई धरण प्रकल्प लवकरच हाती घेणार'

पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ होणार नाही, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. तर, आठ टक्के वाढ झालेली नाही. माहिती घेत निवेदन केले पाहिजे. २५ वर्षातील गळती थांबवावी, असा टोला महापौर रितू तावडे यांनी विरोधकांना लगावला.

दररोज ४१०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा

मुंबईकरांना दररोज ४१०० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करताना, जागतिक आरोग्य संघटना आणि आय एस १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसारच जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. एकूणच, मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो.

पाणीपुरवठा यंत्रणेत पांजरापूर (१४४० दशलक्ष लीटर प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० दशलक्ष लीटर प्रतिदिन), विहार (१०० दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि तुळशी (१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) येथे पाणी शुद्धीकरणाकरिता आणले जाते.

पाण्यावर पॉली एल्युमिनियम क्लोराईड (पीएसी), रॅपिड सँड फिल्टर्स, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर आदी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, शुद्ध पाणी मुंबईकरांना पुरवले जाते.
 

Web Title: water bill hike talks halted municipal corporation offers relief to mumbaikars