लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सखल भागामध्ये पाणी साचू नये याकरिता पालिकेने ५००हून अधिक पाणी उपसा तसेच फिरत्या उदंचन पंपांची व्यवस्था केली असतानाही सोमवारच्या पावसात मुंबई पाण्याखाली गेली. त्यामुळे स्थानिक रहिवासी, वाहनचालक यांचे अतोनात हाल झाले. पालिकेने कोट्यवधी खर्चून भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोग परळ परिसरातील हिंदमाता भागात केला. तेथे दोन वर्षे पाणी न साचल्याने पालिकेने स्वतःची पाठ थोपटून घेतली खरी, मात्र सोमवारी हिंदमाता भागात पाणी तुंबले. पालिकेने सातही उपसा पंप कार्यान्वित करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या आधी मे महिन्यातही उपसा पंप यंत्रणा कार्यान्वित नसल्याने हिंदमाता परिसरात पाणी साचले होते. हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. अनेक वाहने बंद पडत होती. दुकानांतही पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी डॉ. आंबेडकर मार्गावरील वाहतूक बंद ठेवून ती पुलावरून वळवण्यात आली.
भूमिगत टाक्यांचा प्रयोग फसला?
हिंदमाता परिसरात भूमिगत टाकी बांधलेली असली तरी त्याची क्षमता ताशी ५५ मिमी पावसाचे पाणी साठवू शकेल एवढीच आहे. त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर या परिसरात पाणी भरणारच हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे हिंदमातातील भूमिगत टाक्यांचा प्रयोग फसला अशी टीका ही नागरिकांकडून आता होत आहे.
किंग्ज सर्कलही पाण्याखाली
किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, षण्मुखानंद सभागृह परिसर हा भागही सोमवारी पाण्याखाली गेला. येथे मिनी पंपिंग स्टेशन उभारणे, पर्जन्यवाहिन्यांचा विस्तार तसेच नव्या पर्जन्यवाहिन्या बांधल्या होत्या.
पालिकेची यंत्रणा तैनात
पालिकेचे अधिकारी, अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून होती. पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पावसाच्या संततधारेमुळे निचरा वेगाने होण्यात अडचणी निर्माण झाल्या. पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात आले होते. पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात आल्या.