खड्डेयुक्त सहार कार्गो रोडला पालिका आयुक्तांचं नाव; वॉचडॉग फाउंडेशनची गांधीगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 19:05 IST2019-07-31T19:02:56+5:302019-07-31T19:05:19+5:30
पालिका, जीव्हीके कंपनीची टोलवाटोलवी

खड्डेयुक्त सहार कार्गो रोडला पालिका आयुक्तांचं नाव; वॉचडॉग फाउंडेशनची गांधीगिरी
-मनोहर कुंभेजकर
मुंबई: अंधेरी (पूर्व)सहार कार्गो रोड येथून रोज सुमारे 2000 ट्रक आणि अवजड वाहने मार्गक्रमण करतात. या रस्त्यावर खड्ड्यांचे मोठे साम्राज्य आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासन व जीव्हीके कंपनी यांना जाब विचारण्यासाठी आज वॉचडॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत सहार कार्गो रोडला मुंबई महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे नाव दिले.
याबाबत अधिक माहिती देतांना वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा आणि गॉडफ्रे पिमेटा यांनी सांगितले की, सध्या मुंबईतील अनेक रस्त्यांची खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी स्थिती आहे. अंधेरी पूर्व सहार कार्गो रोड येथे मोठे प्रमाणात खड्डे आहे. याबाबत महापालिका के पूर्व विभाग आणि जिव्हीके कंपनी यांच्याकडे तक्रारी केल्या असता हा रस्ता आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगून टोलवाटोलवी करतात. तर जिव्हीके कंपनी या रस्ताची मालकी एमएमआरडीएकडे असल्याचे सांगते.
या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याऐवजी आमच्या अखत्यारित हा रस्ता येत नाही असे सांगून टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे आता आमची आणि सहार गावातील नागरिकांची सहनशक्ती संपली आहे. त्यामुळे येथील रस्ता खड्डे मुक्त होण्यासाठी सहार कार्गो रोडचे श्री प्रवीण परदेशी मार्ग नामकरण केले अशी माहिती त्यांनी दिली.