Join us
Daily Top 2Weekly Top 5

साडे तीन हजार कुटुंबांवर वॉच; कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचा अहवाल निगेटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 06:28 IST

कोरोनाबाधित व्यक्ती वर्तकनगर येथील दीड हजार कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या एका सोसायटीत आपल्या पत्नीसह रहात होती.

मुंबई : लंडनहून परतलेल्या ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. मात्र, या महिलेला १४ दिवस विलगिकरण कक्षात न ठेवता होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. महिला पुन्हा इमारतीत परतल्याने वर्तकनगरच्या सोसायचीत विशेषत: त्या इमारतीतल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे . या भागातील तब्बल साडेतीन हजार कुटुंबांची चौकशी पालिकेच्या पथकांनी सुरू केली असून पुढिल १४ दिवस दिवस त्यांच्यावर नियमित वॉच ठेवला जाणार आहे.

ही कोरोनाबाधित व्यक्ती वर्तकनगर येथील दीड हजार कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या एका सोसायटीत आपल्या पत्नीसह रहात होती. लंडनहून परतल्यानंतर प्रकृती ठिक असल्याने या व्यक्तीने १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा प्रोटोकाल पाळला नव्हता. प्रकृती बिघडल्याने सुरवातीला तीन दिवस वर्तकनगर येथील रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर मुलुंड येथील एका रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तिथे केलेल्या तपासणीत या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही पालिकेच्या पथकांनी तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांना संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय या रुग्णाने ठाण्यातील ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते तिथले डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि रुग्ण अशा ४० जणांची तपासणी पालिकेकडून सुरू आहे.

पालिकेच्या पथकांचा डेरा

हे कुटुंब वास्तव्याला असलेल्या इमारतीतल्याच नव्हे तर संपुर्ण सोसायटीसह आसपासच्या इमारतीतल्या सुमारे साडे तीन हजार कुटुंबांकडे पालिकेच्या पथकांनी चौकशी सुरू केल आहे. या कुटुंबांपैकी कुणी आजारी आहे का, त्यांच्यापैकी कुणी अलिकडे परदेश प्रवास केला होता का अशा स्वरुपाची माहिती संकलित करून प्रत्येकाचे फोन नंबरही नोंदवून घेतले जात आहेत. पुढले १४ दिवस ही सर्व कुटुंब आमच्या निरिक्षणाखाली असतील असे डॉ. वर्षा ससाणे यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र