२६ जुलैच्या प्रलंयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईत नव्हती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:57 AM2020-08-07T05:57:40+5:302020-08-07T05:57:49+5:30

पालिका आयुक्त; चार तासांत ३०० मिमी पाऊस, ताशी १०१ किमी वेगाने वाहिले वारे

This was not the case in South Mumbai even after the torrential rains on July 26 | २६ जुलैच्या प्रलंयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईत नव्हती

२६ जुलैच्या प्रलंयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईत नव्हती

Next

मुंबई : दक्षिण मुंबई परिसराने बुधवारी ४ तासांत तब्बल ३०० मिमी पाऊस आणि प्रतितास १०१ किमी वेगवान वाऱ्याचा सामना केला. ही चक्रीवादळसदृश्य स्थिती होती. सुदैवाने संपूर्ण मुंबईत अशी स्थिती नव्हती. मात्र दक्षिण मुंबईत नरिमन पॉर्इंट, कुलाबासह डी विभाग क्षेत्रामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. २६ जुलै २००५ च्या प्रलंयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईने अनुभवली नव्हती, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

केम्प्स कॉर्नर येथील खचलेल्या भागाची पालिका आयुक्तांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांना वेगाने काम करण्याचे तसेच पेडर रोडवरील वाहतूक खोळंबणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पालिका आयुक्तांनी सांगितले की, पावसाचा परिणाम म्हणून उपनगरी रेल्वे सेवा बंद झाली. त्यावेळी रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आदींशी समन्वय साधून लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी यशस्वी प्रयत्न केले. पालिका प्रशासनाच्या यंत्रणेने अथक प्रयत्न करून साचलेल्या पाण्याचा निचरा केला. बहुतांश भागांमध्ये पाणी पूर्णपणे ओसरले आहे. पावसानेही काही काळ विश्रांती घेतल्याने विविध उपाययोजनांना वेग आला. उपनगरीय रेल्वे सेवा गुरुवारी सकाळी सुरू झालीे. जे. जे. रुग्णालयात साचलेल्या पाण्याचा त्वरेने निचरा करण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाने केली. जोरदार पावसाच्या भाकिताच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्वच कोरोना आरोग्य रुग्णालये व समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांत विशेष खबरदारी घेतली होती. त्यामुळे सर्व ठिकाणी रुग्णांना योग्यरित्या उपचार मिळत आहेत.

चार जलवाहिन्यांना हानी
केम्प्स कॉर्नर येथील संरक्षक भिंत खचल्याने ४ जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली. यामुळे एन. एस. पाटकर मार्ग, ए. के. मार्ग, पेडर रोड, सोफिया लेन, कार्माईकेल मार्ग, राघोजी मार्ग, फॉर्जेट हिल व रोड, अल्टामाऊंट रोड आदी भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता बाधित भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पर्यायी जलवाहिनी जोडून संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे कामही पालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले.

४० ते ५० झाडे कोसळली
संरक्षक भिंत खचल्याने पाटकर मार्गावर निर्माण झालेला ढिगारा तसेच उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचे काम महापालिका यंत्रणा, अग्निशमन दल आदींच्या समन्वयाने तातडीने सुरू करण्यात आले. केम्प्स कॉर्नर ठिकाणी भिंत खचून झालेला ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरू असून या दुर्घटनेमुळे येथील जवळपास ४० ते ५० झाडे उन्मळून पडली आहेत. संरक्षक भिंतीसह इतर डागडुजी तसेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
 

Web Title: This was not the case in South Mumbai even after the torrential rains on July 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.