आरोग्यम् धनसंपदेवर ‘वॉर रूम’ची नजर; विविध आरोग्य योजनांची एकाच छताखाली अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:51 IST2025-10-21T09:51:55+5:302025-10-21T09:51:55+5:30
गैरव्यवहार टाळण्यासाठी कठोर पावले

आरोग्यम् धनसंपदेवर ‘वॉर रूम’ची नजर; विविध आरोग्य योजनांची एकाच छताखाली अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि आरोग्यविषयक सर्व योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात येणार आहे. ही वॉर रूम मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार आहे.
यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
सध्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना आणि इतरही योजना राबविल्या जातात. त्याची योग्य अंमलबजावणी वॉर रूम करेल.
धर्मादाय मदत कक्षाचे थेट नियंत्रण
रुग्णांचे सर्व अर्ज, शंका व तक्रारींचे निवारण या वॉर रुमच्या माध्यमातून केले जाणार. त्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे थेट नियंत्रण राहणार आहे.
वॉर रुममध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय. महिला व बालविकास, कामगार, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, दिव्यांग कल्याण आणि विधि विभागाचे सचिव तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख सदस्य, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहायक संचालक सदस्य सचिव असतील.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करून गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी या ‘वॉर रुम’ची स्थापना करण्यात येत आहे. - रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी.