Join us

थुंकण्यावरून आता संजय राऊत-अजित पवार यांच्यात वाक्‌युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 05:47 IST

संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीचा अनेकांनी निषेध केला असून अनेक प्रतिक्रिया आणि पदसाद उमटत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकनाथ शिंदे समर्थक आ. संजय शिरसाट व खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच ऑन कॅमेरा थुंकणारे खा. संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात या विषयावरून वाक् युद्ध रंगले आहे.  

राऊत यांच्या थुंकण्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाने तारतम्य बाळगले पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी आम्हाला राजकीय सुसंस्कृतपण शिकविला. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली की, धरणातील पाण्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यापेक्षा थुंकणे कधीही चांगले. ज्याचे जळते त्याला कळते. आम्ही भोगत आहोत पण कधी पळून गेलो नाही. त्यावर पुन्हा अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली असता पवार म्हणाले की, मी यावर बोलू इच्छित नाही. काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे, मी त्यांचा आदर करतो. दरम्यान संजय राऊत यांच्या विधानावरून आक्रमक झालेल्या शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मुंबई, पालघर, शहापूर, हिंगोली, जळगाव, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने केली.

संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीचा अनेकांनी निषेध केला असून अनेक प्रतिक्रिया आणि पदसाद उमटत आहेत. शिंदे गटाकडून आंदोलनही करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

 

टॅग्स :संजय राऊतअजित पवार