चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद, ‘माणूस-बिबट्याचे नाते समजून घ्यायचे आहे’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 06:10 AM2020-08-02T06:10:46+5:302020-08-02T06:11:05+5:30

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

‘Want to understand the human-leopard relationship’ | चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद, ‘माणूस-बिबट्याचे नाते समजून घ्यायचे आहे’

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद, ‘माणूस-बिबट्याचे नाते समजून घ्यायचे आहे’

googlenewsNext

सचिन लुंगसे 

मुंबई : मुंबईसह लगतच्या परिसरातील बिबट्यांचा अभ्यास करताना आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहोत. या अभ्यासातून मुंबईतील बिबट्या आणि मुंबईकर हे एकमेकांशी जुळवून घेत कसे जगत आहेत हे आम्ही जगाला समजावून सांगणार आहोत. यातून बिबट्या आणि माणसातील संघर्ष कमी होण्यास मदत होईल. फक्त या अभ्यासासाठी आम्हाला मुंबईकरांचे आशीर्वाद हवे आहेत, अशी भावना वाइल्डलाइफ कंझर्व्हेशन सोसायटी-इंडियाच्या डॉ. विद्या अत्रेय यांनी व्यक्त केली. याचसंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

अभ्यास कशा प्रकारे करण्यात येईल?
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात? त्यांचे भ्रमण कसे होते? याबाबत अभ्यास करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकार, वनविभाग, एनजीओ, विद्यार्थी, प्रसारमाध्यमे यांना अभ्यासात सहभागी करून घेण्यात येईल. हे करताना बिबट्या, मुंबईकर आणि उर्वरित वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्न केला जाईल.
कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?
मान्सून ही सर्वांत मोठी अडचण आहे. प्रकल्पासाठी परवानगी मिळाली आहे. निधी येण्यास तीन महिने लागतील. कॉलर येण्यास तीन महिने लागतील. जानेवारी, फेब्रुवारीत आम्हाला कॉलर मिळेल. परिणामी, प्रकल्पाचा वेळ पुढे निघून जाईल. तोवर मान्सून सुरू होईल. पाऊस सुरू असताना बिबट्याला कॉलर चीप लावणे कितपत शक्य होईल; हे सांगता येणार नाही. शिवाय, पाऊस पडला आणि कॉलरचा भाग ओलसर झाला तर अडथळे येतील. कॉलर लावल्यानंतर मान्सूनमुळे तो कितपत बाहेर येईल हादेखील प्रश्नच आहे. तो बाहेर न आल्यास त्याचा माग काढणे अवघड होईल.
मुंबईकरांची मदत कशी घेणार?
उत्तर - मुंबई आणि आसपासच्या परिसरातील लोकसंख्येचा आम्हाला त्रास होणार नाही. मुंबईत बिबट्या आणि मानवाचा संघर्ष पूर्वी खूप होता. मात्र गेल्या काही वर्षांत हे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. आता संघर्ष नसल्याने प्रकल्पासाठी ही योग्य वेळ आहे. आम्हाला येथे शास्त्रशुद्ध अभ्यास करता येईल. मुंबईकरांचा फायदा होईल. कारण आम्ही याबाबत मुंबईकरांशी संवाद साधणार आहोत. मुंबईकर आणि बिबट्याचे नाते कसे आहे? याची माहिती आम्हाला मिळेल. आधी लोक बिबट्याला घाबरत होते.

नेमके काय
साध्य होईल?
हा प्रकल्प राज्याचा वन विभाग आणि आमचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांची प्रकल्पासाठी निश्चितच मदत होईल. वन्यप्राणी मनुष्यवस्तीलगत वास्तव्य करतात तेव्हा याकडे कोणत्या दृष्टीने बघायचे? हे खूप महत्त्वाचे असते. यामुळे लोकांची मानसिकता बदलते. वन्यप्राण्यांनाही याचा फायदा होईल. कारण, पूर्वी बिबट्या पाहिला की पिंजर लावा, असे म्हटले जायचे. मात्र आता मुंबईकर बदलत आहेत. बिबट्याबरोबर ते कसे राहतात? हे आम्ही या माध्यमातून जगाला समजावून सांगणार आहोत. मुंबईचे उदाहरण आम्ही जगाला देऊ.


अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत होईल का?
बिबट्या वाघासारखा नाही. त्याला एकदा पकडले की तो पुन्हा पिंजºयात येणे खूप अवघड आहे. ताडोबामध्ये गेल्यास तुम्ही गाडीमधून वाघाला पाहू शकता. त्याला भूल देत बेशुद्ध करू शकता. बिबट्याबाबत असे होत नाही. तुम्हाला तो दिसणारच नाही. आम्ही प्रकल्पासाठी रेडिओ कॉलर नावाचे तंत्रज्ञान वापरत आहोत. रेडिओ कॉलरला जीपीएस चीप, सीम कार्ड लावले जाते. यामुळे बिबट्या कोणत्या वेळी कुठे होता? हे समजण्यास मदत होईल. प्रत्येक पाच तासांनी याचे रीडिंग येईल. आता हे तंत्रज्ञान अत्याधुनिक झाले आहे. आमच्या प्रकल्पाचा अन्य वन्यप्राण्यांना, लोकांना त्रास होणार नाही. कारण १० वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा हे काम केले तेव्हा असा कोणताच त्रास कोणाला झाल्याचे
ऐकीवात नाही.

Web Title: ‘Want to understand the human-leopard relationship’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.