पालिका निवडणूक लढवायची का?विधानसभेतील पराभवानंतर मनसे पदाधिकारी संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 06:26 IST2024-12-07T06:25:57+5:302024-12-07T06:26:26+5:30
लोकसभेतील अपयशानंतर महायुतीने विधानसभेत यश मिळवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

पालिका निवडणूक लढवायची का?विधानसभेतील पराभवानंतर मनसे पदाधिकारी संभ्रमात
मुंबई : मनसेने कधी भाजप तर कधी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली. अशात पक्षाचे धोरण निश्चित नसल्यामुळे विधानसभेत पराभव झाला. त्याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उमटणार आहेत. त्यामुळे मनसेचे काही पदाधिकारी अन्य पर्याय शोधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभेतील अपयशानंतर महायुतीने विधानसभेत यश मिळवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मनसे पक्षामध्ये कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे थांबायचे की दूसरी वाटशोधायची याचा विचार पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
सत्तेशिवाय ध्येय साध्य करता येत नसल्याची शक्यता नसल्यामुळे हे पदाधिकारी नाराज झाले आहेत. विधानसभेत एकही आमदार निवडून न आल्याने पक्षाची मान्यता रद्द होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या मोठी असेल, असे सूचक विधानही एका पदाधिकाऱ्याने केले.
कोणत्याही निवडणुकीत जय, पराजय होतच असतो. अपयशाने खचून जाणारे हे पक्षाचे कार्यकर्ते नसतात. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोण आपल्या गरजेला धावून येतो. जनतेसाठी कोण उमेदवार उपलब्ध असतो, त्याचे कर्तृत्व, संपर्क यावर विजय अवलंबून असतो. मनसेचे पदाधिकारी याबाबतीत आघाडीवर आहेत. त्यामुळे पराभव, नैराश्य झटकून मनसैनिकाने नव्याने धावायला पाहिजे.
- संजय नाईक, सरचिटणीस, मनसे
स्थानिक पातळीवर समस्या सोडविण्यासाठी मनसैनिक नेहमीच पुढे असतो. पक्षाचे ध्येय, धोरणे ठाम असल्यामुळे खरे मनसैनिक कायम पक्षासोबत असतील. राजकीय पराभव झाल्यामुळे कोणताही पक्ष लहान किंवा मोठा ठरत नाही. आमच्यामध्ये कसलीही चलबिचल नाही. पक्षाने आदेश दिल्यास पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागू.
- अवधूत चव्हाण, मनसे दक्षिण मुंबई लोकसभा उपसंघटक