बिबट्यांचा शिरकाव रोखण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती भिंत : वनमंत्री गणेश नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:53 IST2025-07-09T05:53:10+5:302025-07-09T05:53:41+5:30

वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उद्यानाच्या आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच, उपग्रहाची मदत घेण्याचा विचार सुरू आहे.

Wall around Sanjay Gandhi National Park to prevent leopards from entering: Forest Minister Ganesh Naik | बिबट्यांचा शिरकाव रोखण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती भिंत : वनमंत्री गणेश नाईक

बिबट्यांचा शिरकाव रोखण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती भिंत : वनमंत्री गणेश नाईक

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नागरिकांचा बिबट्यांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा शिरकाव होऊ नये यासाठी उद्यानाच्या चारी बाजूंनी भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे येथील नागरिकांचे राष्ट्रीय उद्यानाबाहेर आरे परिसरात म्हाडामार्फत घरे बांधून पुनर्वसन करण्यात येईल, असे वन मंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.

आ. मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानात प्रशासनामार्फत नैसर्गिक अधिवासाचे प्रभावीपणे संवर्धन करण्यात आल्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली. पण, बिबट्यांची उपजीविका ज्या प्राण्यांवर अवलंबून आहे त्याबद्दल प्रशासनामार्फत नैसर्गिक अधिवासामार्फत प्रभावीपणे संवर्धन करण्यात आले आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर मंत्री नाईक म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या ५४ असून, त्यांच्या खाद्यासाठी प्राण्यांची संख्या पुरेशी आहे. छोट्या प्राण्यांच्या संगोपनासाठी पुरेशा प्रमाणात फळझाडे लावण्यात येत आहेत. वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उद्यानाच्या आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच, उपग्रहाची मदत घेण्याचा विचार सुरू आहे.

वन कायद्यानुसार मृतांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत
मंत्री नाईक यांनी याबाबत माहिती देताना राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासी पाड्यातील तीन लहान मुले बिबट्याच्या हल्ल्यात दगावली आहेत. वन कायद्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत दिली आहे. मात्र, यापुढे अशी मदत देण्याची वेळ कुणावरही येऊ देणार नाही अशा पद्धतीने येथील आदिवासीपाड्यांचे संरक्षण केले जाईल, असे सांगितले. आ. सत्यजित तांबे यांनी बिबट्यांची नसबंदी करणार का? असा प्रश्न विचारला असता याबाबत केंद्रीय वन खात्याला पत्र पाठविले आहे. तिथून परवानगी मिळाल्यास पुढील कार्यवाही करू, असे मंत्री नाईक म्हणाले.

Web Title: Wall around Sanjay Gandhi National Park to prevent leopards from entering: Forest Minister Ganesh Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.