आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 06:26 IST2026-01-15T06:26:16+5:302026-01-15T06:26:38+5:30
२९ महापालिकांसाठी आज मतदान, उद्या मतमोजणी; दुबार मतदान रोखण्याचे आयोगापुढे आव्हान, गडबड-गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क

आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
मुंबई: सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि अनेक वर्षांनी होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीचे मतदान गुरुवारी होत आहे. ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार हे १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील. सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू होईल आणि ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यत चालेल. लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सत्तेतील मित्रपक्ष काही ठिकाणी एकमेकांविरोधात उभे राहिले, तर काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची झाली असून राज्यातील महानगरांवर वरचष्मा कोणाचा याचा फैसला मतदार करणार आहेत.
या महापालिकांमध्ये सर्वाधिक चुरस
मुंबई : १९ वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू यांच्याविरोधात भाजप आणि शिंदेसेनेची महायुती अशी लढत असताना मुंबईकर कौल कुणाला देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड : या दोन्ही महापालिकांत अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी भाजपच्या विरोधात एकत्र आल्याने येथील निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांचे होमपिच असलेली नागपूर महापालिका भाजपचा गड मानली जाते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असेल.
नाशिक : लहानमोठ्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक गाजली. भाजपमध्ये अंतर्गत रुसवेफुगवे बघायला मिळाले.
छत्रपती संभाजीनगर: अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या या महापालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळ अजमावत आहेत.
कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई : येथे भाजप व शिंदेसेनेत अटीतटीची लढत आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदे वरचढ की भाजपचे मंत्री गणेश नाईक ? आणि कल्याण डोंबिवलीत प्राबल्य शिंदेंचे की रवींद्र चव्हाणांचे याचा फैसला होणार आहे.
...तरच 'पाडू'चा वापर
मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्रात मतमोजणीवेळी काही तांत्रिक अडचण आल्यास 'पाडू' (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राद्वारे निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र, 'पाडू'चा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १४० 'पाडू' उपलब्ध करण्यात आले आहेत. मतमोजणीवेळी अडचण निर्माण झाली, तर 'पाडू' यंत्राच्या माध्यमातून मतमोजणी पूर्ण केली जाईल. 'पाडू' हे स्वतंत्र मतदान यंत्र नसून आधीच नोंदवलेल्या मतांची माहिती प्रदर्शित करण्यासाठी वापरण्यात येणारे सहाय्यक यंत्र आहे.
ईव्हीएमची सज्जता
निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटचा समावेश आहे. मोठ्या संख्येने मतदान करा. आपले मत आपल्या शहराचे भवितव्य ठरवू शकते. लोकशाहीतला तो आपला महत्त्वाचा हक्क आहे आणि तो आपण बजवायला हवा- दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र