मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 06:59 IST2026-01-15T06:59:18+5:302026-01-15T06:59:29+5:30
ओळख पटवण्यासाठी १२ कागदपत्रे ग्राह्य

मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान होत आहे. त्याकरिता मतदारांना निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलद्वारेही मतदार यादीतील आपले नाव घरबसल्या शोधता येणार आहे.
मतदार यादीतून नाव वगळले जाणे, पत्त्यात बदल झाल्याने मतदान केंद्र बदलणे, अशा तक्रारी अनेक वेळा मतदानाच्या दिवशी येतात. मतदानाच्या आधीच मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही, केंद्र कोणते आहे आणि मतदार क्रमांक काय आहे, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
मतदार यादीत नाव तपासण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर लॉग इन करता येते. येथे मतदार आपले नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, जन्मतारीख किंवा ओळखपत्र क्रमांक टाकून शोध घेऊ शकतात.
मोबाइल क्रमांकाच्या आधारेही नाव शोधता येणार आहे. यादीत नाव आढळल्यास संबंधित मतदाराचा क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता व विधानसभा किंवा प्रभागाची माहिती दिसते. नाव न आढळल्यास, तपशिलात चूक असल्यास तत्काळ संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीतील नावाची खात्री करणे, ही पहिली आणि महत्त्वाची पायरी असल्याने, मुंबईतील सर्व मतदारांनी शेवटच्या क्षणी अडचण येऊ नये, यासाठी आपली नोंद तपासावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ओळख पटवण्यासाठी १२ कागदपत्रे ग्राह्य
मतदारांना ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ पर्यायी कागदपत्रांची यादी जाहीर केली असून, त्यापैकी कोणतेही एक मूळ कागदपत्र दाखवून मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड
सरकारी ओळखपत्र : केंद्र / राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेले फोटोसह ओळखपत्र.
बँक / पोस्ट ऑफिस पासबुक: राष्ट्रीयीकृत बँका किंवा पोस्ट ऑफिसमधील फोटो असलेले पासबुक.
दिव्यांग प्रमाणपत्रः सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले फोटोसह दिव्यांगत्त्वाचे प्रमाणपत्र,
मनरेगा जॉब कार्ड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील ओळखपत्र.
पेन्शन कागदपत्र : निवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या अवलंबितांचे फोटो असलेले पेन्शन संबंधित कागदपत्र (उदा. पासबुक किंवा प्रमाणपत्र).
अधिकृत ओळखपत्रः लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधानपरिषद सचिवालयाने सदस्यांना दिलेले ओळखपत्र.
आरोग्य विमा स्मार्ट कार्ड : केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसह कार्ड.