आवाज बदल शस्त्रक्रिया २० हजारांत; तृतीय पंथीयांसाठी बॉम्बे हॉस्पिटलचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:43 IST2025-01-30T13:42:56+5:302025-01-30T13:43:11+5:30
रुग्णालयाने यापूर्वीच तृतीयपंथीसाठी स्वतंत्र ‘ट्रान्स व्हॉइस क्लीनिक’ सुरू केले आहे.

आवाज बदल शस्त्रक्रिया २० हजारांत; तृतीय पंथीयांसाठी बॉम्बे हॉस्पिटलचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काही वेळा लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुषाची बाई झाल्यानंतर मूळचा पुरुषी आवाज कायम राहतो. त्यावर वैद्यकशास्त्राने आवाज बदल शस्त्रक्रियेचा उपाय शोधला आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र बॉम्बे रुग्णालयाने तृतीयपंथींना आवाज बदल शस्त्रक्रियेचा खर्च परवडावा म्हणून ती स्वस्त दरात करण्याचा निर्णय सामाजिक भावनेतून घेतला आहे.
रुग्णालयाने यापूर्वीच तृतीयपंथीसाठी स्वतंत्र ‘ट्रान्स व्हॉइस क्लीनिक’ सुरू केले आहे. त्यात तृतीयपंथीच्या आवाज बदलाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात. यापुढे २० हजारांत ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णाला जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात येणार आहे. ही सवलत हार्मोन्स बदलाचे उपचार सुरू असलेल्या तृतीयपंथीसाठी आहे. याबाबत अधिक माहिती देताना या क्लिनिकच्या व्हॉइस सर्जन डॉ. नुपूर नेरुरकर म्हणाल्या, “तृतीयपंथींमध्ये पुरुष ते महिला असा लिंगबदल करताना हॉर्मोन्सचे उपचार दिले जातात. मात्र महिलांचे हॉर्मोन्स त्या व्यक्तीला मिळाले तरी आवाज मात्र पुरुषीच राहतो. त्यामुळे अनेक जण आवाज बदलासाठी प्रयत्न करतात. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही.”
कशी केली जाते शस्त्रक्रिया?
डॉ. नुपूर नेरुरकर यांनी ६० हून अधिक तृतीयपंथीवर आवाज बदलाची शस्त्रक्रिया केली आहे. “पूर्वी गळ्यावर चीर घेऊन ही शस्त्रक्रिया केली जात होती. मात्र आता एंडोस्कोपिकली म्हणजे गळ्यावर कोणतीही चीर न घेता शस्त्रक्रिया केली जाते. यात स्वरयंत्राच्या घडीची लांबी कमी केली जाते. त्यामुळे पुरुषांचा आवाज महिलांसारखा होतो.
सध्याच्या काळातील ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. यामुळे तृतीयपंथींच्या आयुष्यात मोठा बदल होतो.
डॉ. राजकुमार पाटील,
संचालक - वैद्यकीय सेवा, बॉम्बे हॉस्पिटल