वाचनीय लेख - विठ्ठला, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळेल..?

By अतुल कुलकर्णी | Published: November 27, 2022 09:38 AM2022-11-27T09:38:03+5:302022-11-27T09:39:17+5:30

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. सांगलीच्या गेस्ट हाउसला ते मीटिंग घेत होते.

Vitthala, when will Maharashtra get such a Chief Minister..? like vasant dada patil | वाचनीय लेख - विठ्ठला, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळेल..?

वाचनीय लेख - विठ्ठला, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळेल..?

Next

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय पांडुरंगा, 
साष्टांग दंडवत 

तूच घडविसी, तूच फोडिसी 
कुरवाळिसि तू, तूच ताडिसी 
न कळे यातुन काय जोडिसी?
देसी डोळे परि निर्मिसी, तयांपुढे अंधार 
विठ्ठला, तू वेडा कुंभार..!

ग. दि. माडगूळकर यांनी हे गीत लिहिलं. त्याला अनेक वर्षे झाली. सगळं तूच घडवतोस... तूच मोडतोस... तुझे त्यामागचे हेतू काय असतात, तेही कोणाला कळत नाहीत. असे असताना, ज्या महाराष्ट्रात तू राहतोस, जिथल्या हजारो माळकरी, गोरगरीब शेतकऱ्यांना तू हक्काचा आधार वाटतोस... त्या ठिकाणच्या नेत्यांना, पुढाऱ्यांना मात्र तुझा आधार का वाटत नाही...? विठ्ठला, उगाच सगळे तुला सोडून कुठेतरी दूर परराज्यातल्या देवीदेवतांकडे जातात... ते असं का वागतात... का हे देखील तूच घडवून आणतोस..?

कोणी कोणत्या देवाकडे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न..? आपण त्याला कसं अडवणार..? कोणी देवाकडे जातं... कोणी ज्योतिषाकडे जातं... कोणी नवस बोलतं... कोणी बोललेला नवस फेडायला जातं... पण ज्या राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा केलेला आहे, त्या राज्यातल्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी जर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कामं केली, तर जनतेने त्या कायद्याचं काय करायचं विठ्ठला...? तू आम्हालाच विचारशील, ज्ञानेश्वर माउलींनी काय लिहून ठेवलंय माहिती आहे का...? आणि आम्हाला चार ओळी ऐकवशील...

दुरितांचे तिमिर जावो । 
विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । 
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
विठुराया, हे ठीक आहे. पण हे सगळं व्यक्तिगत आयुष्यापुरतं असावं असं तुला वाटत नाही का..? कधीतरी या नेत्यांनी शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून एखादा नवस बोलला आणि शेतकऱ्याला खरंच चार पैसे चांगले मिळाले, तर त्याच बळीराजाला घेऊन नवस फेडायला जाणारा नेता कधी दिसला नाही... 

पांडुरंगा एक प्रसंग आठवला. वसंतदादा पाटीलमुख्यमंत्री होते. सांगलीच्या गेस्ट हाउसला ते मीटिंग घेत होते. बाहेर काही शेतकरी त्यांना भेटायला आले. त्यांच्या सचिवाने शेतकऱ्यांना आणि दादांना भेटू दिलं नाही. दादा भेटतील या आशेनं ते शेतकरी गेस्ट हाउसच्या समोरच एका झाडाखाली बसले. मीटिंग संपल्यानंतर दादांनी विचारलं, कोणी भेटायला आलंय का..? तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी काही शेतकरी आले आहेत, असं सांगितलं. दादांनी विचारलं, कधी आलेत? तेव्हा तो अधिकारी म्हणाला, सकाळीच आले आहेत. दादा चिडले. सकाळी आले आणि तुम्ही मला आता सांगताय... असं म्हणत दादा उठले, आणि त्या शेतकऱ्यांकडे निघाले. सगळीच धावपळ सुरू झाली... दादा शेतकऱ्यांजवळ गेले. तेवढ्यात कुणीतरी खुर्ची आणली. दादांनी खुर्ची दूर लोटली आणि तिथेच एका दगडावर शेतकऱ्यांशी गप्पा मारत बसले... एक फोटोग्राफर आला. तो फोटो काढू लागला. तेव्हा दादा त्याला म्हणाले, हा फोटो तुझ्या पेपरात छाप... आणि त्याखाली लिही... ‘सरकार शेतकऱ्यांच्या पायाशी..!’ पांडुरंगा, हा प्रसंग आज तुला लिहितानादेखील अंगावर रोमांच उभे राहतात... पण हा असा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासात एकदाच घडला....तो पुन्हा कधी घडेल का..? हे भविष्य कोण सांगेल..? 

विठ्ठला, ए. आर. अंतुले नावाचे मुख्यमंत्री होते. त्यांना भेटायला काही लोक वर्षावर आले होते. मुख्यमंत्री आल्यानंतर सगळ्यांनी उठून नमस्कार केला. एक गृहस्थ डोळ्याला गॉगल लावून बसूनच होते. त्यावर अंतुले यांनी मुख्यमंत्री आलेले असताना उठून उभे राहण्याचे मॅनर्सही नाहीत का? असा तिरकस सवाल केला. थोड्या वेळाने त्यांना कोणीतरी सांगितले की, ते अंध आहेत. संगीत क्षेत्रातील सुरमणी पदवीप्राप्त उत्तमराव अग्निहोत्री असं त्यांचं नाव आहे. हे समजल्यानंतर अंतुलेंच्या पत्नी त्यांच्यावर चिडल्या. झाल्या प्रकाराने अंतुलेही अस्वस्थ होते. आपल्या हातून एका अंधाचा अपमान झाला ही कल्पना त्यांना सहन होईना. त्या अवस्थेतच त्यांनी खासगी सचिव बी. डी. शिंदे यांना बोलावून घेतले. झालेली घटना सांगितली आणि त्यांचे प्रश्न काय आहेत हे विचारून घ्या, अशा सूचना दिल्या. बी. डी. शिंदे यांनी सगळी माहिती घेतली. अग्निहोत्री मुंबईत घर मिळावे म्हणून आले होते. त्यांना मुंबईत नोकरी नव्हती त्यामुळे घरही मिळत नव्हते. अंतुलेंनी आदेश दिला. उद्याचा दिवस उजाडण्याच्या आत त्यांना घर देऊनच मी प्रायश्चित्त घेईन. सगळे सरकार रात्रभर जागे राहिले. अग्निहोत्री यांना घरासाठी  ४८ हजार रुपयांचा चेक मुख्यमंत्री निधीतून रात्रीच दिला गेला. म्हाडाचं घर रात्रीतून ठेकेदार कामाला लावून साफसूफ केलं गेलं. घर मिळालं. दुसऱ्या दिवशी नोकरीचे पत्रही त्यांना दिलं. अंतुले यांनी आपलं प्रायश्चित्त पूर्ण केले.

पांडुरंगा, असं प्रायश्चित्त घेणारा मुख्यमंत्रीदेखील पुन्हा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. देव माणसात शोधावा, कर्मकांडात नाही.... असं जुनेजाणते लोक सांगून गेले. मात्र हे असं का घडतं..? किंवा तू हे सगळं का घडवून आणतोस..? याचं उत्तर तूच आम्हाला दे.... आम्हाला तर काहीच कळत नाही. आम्ही तुझ्या नामस्मरणात आनंद शोधतो... विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल....
- तुझाच बाबूराव

Web Title: Vitthala, when will Maharashtra get such a Chief Minister..? like vasant dada patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.