कुर्ला येथील खैरानी रोडवरील गोदामांना आग, महापौर अन् अतिरिक्त आयुक्तांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:06 AM2019-12-28T06:06:47+5:302019-12-28T06:07:16+5:30

जीवितहानी नाही : स्फोटासह धुराच्या लोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण

Visit of fire, mayor and additional commissioner to the warehouse on Khairani Road in Kurla | कुर्ला येथील खैरानी रोडवरील गोदामांना आग, महापौर अन् अतिरिक्त आयुक्तांची भेट

कुर्ला येथील खैरानी रोडवरील गोदामांना आग, महापौर अन् अतिरिक्त आयुक्तांची भेट

Next

मुंबई :  एल विभागाच्या हद्दीत अाशापुरा कंपाऊंड, सुभाष नगर, खैरानी रोड, साकीनाका येथे लागलेल्या आगी प्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री सुरेश काकानी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अग्निशमन दलासह यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या.

साकीनाका भागातील सुभाष नगर, खैराणी रोड येथे आज दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तीस ते पस्तीस गाळ्यांमध्ये आग लागली. या गोदामांमध्ये रसायने, प्लास्टिक आणि कपडे इत्यादी साठवलेले होते. घटनेची माहिती मिळताच महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी बंब रवाना केले. रसायनांनी पेट घेतल्याने आगीचे रूप वाढल्याचे पाहून सोळा फायर इंजिन, दहा जम्बो टॅंकर, वॉटर टँकर इत्यादी घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यासोबत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकास देखील रवाना करण्यात आले. तसेच आरसीएफ, bpcl, hpcl यामार्फत जादा फोम टेंडर, फायर इंजिन रवाना करण्यात आले.

दरम्यान, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री सुरेश काकानी यांनीदेखील घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली व यंत्रणेला योग्य ते दिशानिर्देश दिले. आग लागलेल्या गोदामांच्या परिसरात नागरिकांनी शिरू नये, आगीमुळे तप्त होऊन धोकादायक झालेल्या रहिवासी घरांमध्ये कोणी शिरकाव करू नये, कोणत्याही प्रकारची जीवीत हानी होऊ नये, त्यासाठी पोलीस प्रशासनासह सर्व मदत यंत्रणांना अतिरिक्त आयुक्तांनी सूचना केल्या. यावेळी संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.

दरम्यान, आपण व्यवस्थापनाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळ परिसरातील रुग्णालयांना करण्याच्या सूचना केल्या होत्या. घटना स्थळी रेल्वे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री मनीष वळंजू हेदेखील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मदत कार्यास उपस्थित होते.

 

कुर्ला पश्चिमेकडील खैरानी रोड येथील आशापुरा कम्पाउंडमधील विविध साहित्याच्या ३० ते ३५ गोदामांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या वतीने घटनास्थळी ९ फायर इंजीन, १ वॉटर टँकर, ७ जम्बो वॉटर टँकर पाठविण्यात आले. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

घटनास्थळावरील आग विझविण्यासाठी फोमच्या वापराकरिता एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी, बीएआरसी, आरसीएफला कळविण्यात आले. शिवाय जेसीबी डम्पर्स आणि अतिरिक्त कामगारांसाठी मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील ‘एल’ वॉर्डलाही कळविण्यात आले. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील बहुतांश बांधकामे ही तळमजला अधिक एक, दोन मजल्याची असून, आगीदरम्यान टाटा आणि अदानीचा कर्मचारी वर्गही आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाला होता.
स्थानिकांकडून प्राप्त माहितीनुसार, संध्याकाळी आग लागली तेव्हा सिलिंडरच्या स्फोटासारखे आवाज होत होते. शिवाय आगीतून उठणारा धूर दूरपर्यंत निदर्शनास येत होता. येथील आगीचे स्वरूप भीषण आणि भयावह असल्याने परिसरातील सर्वच रहिवासी घाबरून घराबाहेर पडले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत येथील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. काही वर्षांपूर्वीदेखील खैरानी रोडवर लागलेल्या भीषण आगीत काही कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. मुळातच येथील परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. येथे जेवढी वस्ती आहे तेवढ्याच प्रमाणावर येथे गोदामेदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या परिसरात ये-जा करणेही कठीण होत असल्याचे चित्र आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील गोदामांनी अग्निशमन नियमांचे पालन करत उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आगीचे प्रमाण दिवसागणिक वाढतच असल्याचे चित्र आहे.

विमान वाहतुकीवर परिणाम नाही

कुर्ला येथील खैरानी रोड हा परिसर विमानतळापासून जवळ आहे. येथील आग भीषण स्वरुपाची असल्याने आगीचा धूर लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पसरला होता. परिणामी विमानतळावर उतरत असलेल्या विमानांच्या वाहतुकीवर काहीसा परिणाम होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र आगीच्या धुराचा विमानांच्या लँडिंगला काहीच फटका बसला नाही. विमानांची वाहतूक सुरळीत सुरू होती, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

खैरानी रोडवर यापूर्वी घडलेल्या आगीच्या घटना
च्१७ डिसेंबर २०१७ : खैरानी रोडवरील मकारिया कम्पाऊंड येथील फरसान दुकानाला लागलेल्या आगीत बारा जणांचा मृत्यू झाला होता.
च्२ मार्च २०१८ : शीतल अपार्टमेंट येथील स्क्रॅप यार्डमध्ये आग लागली होती. यात जीवितहानी झाली नाही.
च्२७ डिसेंबर २०१९ : ३५ गोदामांना आग लागली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

२०१९ मधील आगीच्या घटना

च्१० फेब्रुवारी : माहुल येथील इमारत क्रमांक १४ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आगीच्या झळा तिसऱ्या मजल्यावरील रहिवाशांनाही बसल्या. एका मजल्यावर ३४ घरे असून, १०० हून अधिक कुटुंबे येथे वास्तव्य करतात. वेळेवर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यात जीवितहानी झाली नाही.
च्१८ एप्रिल : गोरेगाव पूर्वेकडील आरे रोडवरील युनिट नंबर २९ मधील एमेराल्ड क्लबमध्ये आग लागली. सहा जण जखमी झाले.
च्५ मे : अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील तळमजला अधिक सात मजली ‘सरिता’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. आगीत तिघे जण जखमी झाले.
च्२४ मे : भेंडीबाजारातील बोहरी मोहल्ला येथील तळमजला अधिक चार मजल्यांच्या पंजाब महाल इमारतीच्या तिसºया मजल्यावरील आगीत दोन ज्येष्ठ महिलांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अकरा जण जखमी झाले.
च्१६ जुलै : विक्रोळी येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सूर्यानगरमधील बॉम्बे गॅस येथे सिलिंडर स्फोटात तिघे जखमी झाले. यापैकी एकाचा मृत्यू झाला.
च्२१ जुलै : कुलाबा येथील तळमजला अधिक चार मजली चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसºया मजल्यावर आग लागून एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले होते. अडकलेल्या १४ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.
च्२२ जुलै : वांद्रे पश्चिमेकडील नऊ मजली एमटीएनएल इमारतीच्या तिसºया आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ८४ हून अधिक जणांना सुखरूप बाहेर काढले.
च्१० सप्टेंबर : वडाळा येथील गणेशनगर, निर्मल विद्यालयाजवळ टाटा पॉवर कंपनीच्या मुख्य वीज वाहिनीची ओव्हरहेड वायर घराच्या छताला लागून स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे येथील खोली क्रमांक ३५३ या घरास लागलेल्या आगीत पाच जण जखमी झाले तर एका मांजरीचा मृत्यू झाला.
च्१७ डिसेंबर : घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी रोड ४ वरील तळमजला अधिक दहा मजली श्रीजी टॉवरच्या पाचव्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाकडून गच्ची आणि जिन्याच्या मदतीने १३ रहिवाशांचे जीव वाचविण्यात आले.
च्२२ डिसेंबर : विलेपार्ले येथील बजाज रोडवरील तळमजला अधिक तेरा मजली लाभ श्रीवल्ली या इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील दोन ते तीन कार्यालयांना आग लागली. दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून चौघांची सुखरूप सुटका करण्यात आली.

Web Title: Visit of fire, mayor and additional commissioner to the warehouse on Khairani Road in Kurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई