Raj Thackeray Balasaheb Thackeray Room at Matoshree: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या ६ वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या. आधी महाविकास आघाडी स्थापना झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाथीने भाजपा महायुतीचे सरकार आले. त्यातच नजीकच्या भूतकाळात ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसले. मराठी मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एका व्यासपीठावर भाषण केले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला. तशातच आज तब्बल ६ वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Uddhav Thackeray Birthday) देण्यासाठी थेट मातोश्रीवर पोहोचले. राज यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीतील खोलीतही जाऊन आले.
राज ठाकरे मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत...
राज ठाकरे यांनी १८ वर्षांपूर्वी शिवसेना सोडली. त्यावेळी ठाकरे बंधूंमध्ये वितुष्ट आले होते. मधल्या काळात दोघांनीही उघडपणे एकमेकांवर टोकाची टीका केली. पण गेल्या दोन महिन्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली. त्यानंतर ५ जुलैला ठाकरे बंधू एकत्र आले. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले. राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनी मातोश्रीवर आले. याआधी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ५ जानेवारी २०१९ रोजी ते आले होते. त्यानंतर आज राज यांनी पुन्हा मातोश्रीची पायरी चढली. राज यांच्यासोबत नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकरदेखील होते. उद्धव यांना शुभेच्छा दिल्यावर राज मातोश्रीमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले. त्याठिकाणी त्यांनी बाळासाहेबांच्या आसनाला अभिवादन केले. या क्षणाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
दरम्यान, त्याआधी आज सकाळी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने मातोश्री फुलांनी सजविण्यात आली होती.
आजच्या शुभदिनी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना युतीची भेट देतात की काय, असा सर्वत्र चर्चा रंगली होती. पण अद्याप तशी घोषणा झालेली नाही. लवकरच याबाबत मोठी घोषणा होईल असे सांगितले जात असल्याने सर्व महाराष्ट्राचे या बातमीकडे लक्ष लागले आहे.