Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘त्रिपुरा’चे हिंसक पडसाद; दगडफेकीत दुकाने-वाहनांचे नुकसान, सध्या स्थिती नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 08:54 IST

पोलिसांनी मिळवले नियंत्रण

मुंबई : त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपासून अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम बांधवांनी राज्यातील विविध शहरांत पुकारलेल्या बंदला व काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

संयम राखण्याचे  गृहमंत्र्यांचे आवाहन

राज्यात आयोजित मोर्चांना काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागामधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

मराठवाडा : अनेक ठिकाणी कडकडीत बंद

औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी सकाळपासून एकही दुकान उघडले नाही. सकाळपासून शांततेत असलेल्या बंदला दुपारी दोन वाजेनंतर हिंसक वळण लागले. नांदेडमध्ये देगलूर नाका परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.

मालेगाव : पोलिसांकडून लाठीमार, १० जखमी

मालेगाव येथे सायंकाळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने तणावपूर्ण परिस्थिती झाली. पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यासह लाठीचार्ज करावा लागला. दगडफेकीत पोलिसांच्या दंगानियंत्रण पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले. ३ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जवानदेखील जखमी झाले.

विदर्भ : दुकानांची तोडफोड, दगडफेक

अमरावती शहरात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. सुमारे ३० हजारांच्या जमावाने अनेक दुकाने व मॉलला लक्ष्य केले. दगडफेक करण्यात आली. हे सर्व अनपेक्षितपणे घडल्याने पोलिसांचीदेखील तारांबळ उडाली. पोलिसांनी सात तक्रारी नोंदवून घेत शेकडो आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यावेळी  पोलिसांशी त्यांची झटापट झाली. बंदला कारंजा (जि. वाशिम) येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदची हाक देणाऱ्यांनी तीन दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले. दगडफेकीत दुकानांच्या काचा फुटल्या तसेच साहित्याचेही नुकसान झाले. 

टॅग्स :त्रिपुरामहाराष्ट्रऔरंगाबाद