Join us  

मनासारखे होत नसल्यानेच दिल्लीत हिंसाचार घडवला; शरद पवारांचा भाजपावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 7:13 PM

राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरामध्ये आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली जळत आहे. केंद्रात सत्तेत असलेला पक्ष दिल्ली जिंकू शकला नाही, पण सांप्रदायिक विचाराने समाजात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरामध्ये आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित पवार यांनी पुढील निवडणुकांतही शिवसेनेसोबत आघाडी करणार असल्याचे सांगितले. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

यानंतर शरद पवार यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते. तर दुसरीकडे देशाची राजधानी जळत होती. राज्यकर्ते जर चुकीचे वागायला लागले, राज्यकर्तेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतील तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्राकडे असते. त्यामुळे दिल्लीत जे घडले त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्राची आहे, असा आरोप पवार यांनी केला. 

दिल्लीची निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधानांसह त्यांच्या मंत्र्यांची वक्तव्ये ही देशातील सांप्रदायिक ऐक्याला बाधा पोहोचवणारी होती. त्यांचाच मंत्री गोळी मारण्याची भाषा करतो. सत्ता ही लोकांचे रक्षण करण्यासाठी असते. दिल्लीत शाळांचीही नासधुस केली. शैक्षणिक संस्थांना आग लावली गेली, असे पवार म्हणाले. 

'ये दिवार तुटती क्यूँ नही, अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार'

दिल्लीत सत्ता मिळाली नसल्याचे, मनासारखे होत नसल्याचे पाहून भाजपाने दिल्लीत दगडफेक, आगी लावण्यास सुरूवात केली. धर्म आणि जातीचा आधार घेऊन समाजात फूट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.

टॅग्स :शरद पवारदिल्लीराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारभाजपा