एमएमआरडीएच्या मेट्रो कामात वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन; केवळ २ ते ३ मार्गदर्शक तत्त्वांचेच पालन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:44 IST2025-12-16T09:42:12+5:302025-12-16T09:44:24+5:30
पालिकेच्या पथकाने बीकेसीतील मेट्रो २ बी मार्गिकेच्या आरएमसी प्लॅन्टवर ४ डिसेंबरला तपासणी केली होती.

एमएमआरडीएच्या मेट्रो कामात वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन; केवळ २ ते ३ मार्गदर्शक तत्त्वांचेच पालन!
अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बीकेसीतील मेट्रो २ बी मार्गिकेच्या कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पालिकेच्या एच ईस्ट वॉर्डने याप्रकरणी एमएमआरडीएचा कंत्राटदार जे. कुमार याला ११ डिसेंबरला नोटीस बजावली. त्याचवेळी पालिकेने पुन्हा १२ डिसेंबरला केलेल्या तपासणीत या मेट्रो मार्गिकेचा आरएमसी प्लॅन्ट, कास्टिंग यार्ड आणि मेट्रो मार्गिका यांच्या कामादरम्यान सर्रास नियमांचे उल्लंघन करण्यात आले. तसेच केवळ २ ते ३ मार्गदर्शक तत्त्वांचेच पालन केल्याचे आढळले. याबाबतचा अहवाल लोकमतला प्राप्त झाला आहे.
मेट्रो २ बी मार्गिकेचे बीकेसीतील काम जे. कुमार या कंत्राटदारामार्फत सुरू आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मेट्रो २ बीचे एमएमआरडीए ग्राऊंड येथील कास्टिंग यार्ड, आरएमसी प्लॅन्ट आणि या मेट्रोच्या कपाडियानगर ते कलानगर जंक्शन या २.५ किमी लांबीच्या मार्गात केलेल्या पाहणीत विविध त्रुटी आढळल्या. कंत्राटदाराने केवळ सीसीटीव्ही आणि कर्मचाऱ्यांना प्रकल्पस्थळी तयार जेवण पुरविण्याच्या नियमांचे पालन केल्याचे आढळल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे.
तीन दिवसांत खुलासा करा!
पालिकेच्या पथकाने बीकेसीतील मेट्रो २ बी मार्गिकेच्या आरएमसी प्लॅन्टवर ४ डिसेंबरला तपासणी केली होती.
त्यामध्ये हवा प्रदूषण नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने ११ डिसेंबरला जे. कुमार या कंत्राटदाराला कारणे दाखया नोटीस बजावली होती. त्यामध्ये नियमांचे पालन न केल्याने काम का थांबवू नये, याबाबत तीन दिवसांत खुलासा करावा, असे आदेश दिले आहेत.
अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
पालिकेने बांधकामांना लागू असलेल्या २८-बिंदू मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक केले आहे. याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.