विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात फेरतपास करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 07:47 IST2025-04-01T07:47:26+5:302025-04-01T07:47:40+5:30
Mumbai Crime News: विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात पोलिसांनी तपासापेक्षा महिनाभरातच आरोपपत्र दाखल करण्याची घाई करत हात वर केले. याला तक्रारदारांनी न्यायालयात विरोध केला. त्यानंतर विक्रोळी न्यायालयाने याप्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले.

विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात फेरतपास करण्याचे आदेश
मुंबई - विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात पोलिसांनी तपासापेक्षा महिनाभरातच आरोपपत्र दाखल करण्याची घाई करत हात वर केले. याला तक्रारदारांनी न्यायालयात विरोध केला. त्यानंतर विक्रोळी न्यायालयाने याप्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले. त्यामध्ये काही साक्षीदार पोलिसांनीच स्वतः उभे केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
जानेवारी महिन्यात घडलेल्या घटनेप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. घटनेच्या दिवसांचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तसेच सर्व माहिती दिली असतानाही सुरुवातीला गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ करत एनसी नोंदविण्यात आली. पुढे मेडिकल रिपोर्टच्या आधारे गुन्हा नोंदवला. त्यातही नोंद गुन्ह्यात नाव माहिती असूनही पोलिसांनी अनोळखी म्हणून नमूद केले, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
काय आहेत आक्षेप?
दुसरीकडे, तपास अधिकारी बदलण्याची मागणी जोर धरताच अवघ्या महिनाभरातच काही जणांचे जबाब नोंदवत आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, यामध्ये साक्षीदारही पोलिसांनीच उभे केल्याचा संशय ॲड. अश्विन भागवत यांनी उपस्थित केला आहे.
पोलिस दाम्पत्य असल्याने पोलिस त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये स्वतंत्र साक्षीदार असल्याने त्यांना दोन्ही गुन्ह्यात जबाब नोंदविणे गरजेचे होते. त्यातही साक्षीदार रिक्षाचालकाचा जबाब आणि पोलिसांना सादर केलेल्या घटनास्थळावरील व्हिडीओतील पुरावे त्यात तफावत दिसून येत असतानाही पोलिसांनी त्याचा जबाब घेतला, असा आरोप भागवत यांनी केला तसेच व्हिडिओत महिला शूटिंग घेणाऱ्याला दादा म्हणताना दिसत आहे.
तर, साक्षीदार मात्र महिला संबंधित व्यक्तीला शिवी कोणी दिली विचारत असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे आता तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.