Join us

'विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली असती पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 21:47 IST

आज विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्ष उमेदवारी देणार होता. परंतु त्यांनी दुसरं नाव दिलं होतं. त्यांनी दिलेल्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात चर्चा करणार होतो

मुंबई -विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार होती. त्यांच्या नावावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तबही केले होते आणि तसे त्यांना कळवण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. 

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राज्याच्या मंत्रीपदावर त्यांनी काम केले आहे. उपमुख्यमंत्रीपदही भूषविले होते. शिवाय खासदारही होते. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटीलही खासदार होते. आज विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्ष उमेदवारी देणार होता. परंतु त्यांनी दुसरं नाव दिलं होतं. त्यांनी दिलेल्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात चर्चा करणार होतो. आजही राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज पक्ष सोडला. त्यांच्याविषयी वेगळं आणि वाईट बोलणं योग्य नाही असं आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. 

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानांमुळे माढा लोकसभा मतदारसंघातले खासदार विजयसिंह मोहिते पाटीलही भविष्यात भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.   

माढा मतदारसंघात आम्ही निष्कर्षापर्यंत आलो आहोत की, आम्ही सक्षम उमेदवार देवू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा माढा जिंकण्याचा भ्रम तुटेल असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.निवडणूका येतात त्यावेळी अनेक प्रश्न असतात. सत्ता असली त्या जवळ जाणारे असतातच. कच्चे दुवे सत्ताधारी साधत असतात असे सांगतानाच माढातील ताकदीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

नीरव मोदी पकडला आणि जामीनावर सुटलाही असे सांगतानाच नीरव मोदी लंडनमध्ये आहे हे सगळ्यांना माहित होते. त्याला आणण्याचे नाटक करत आहेत. मोदींची किंवा सरकारची या देशातून पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची मानसिकता नाही असा आरोपही त्यांनी केला. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा देशातून पराभव का व्हावा हे राज ठाकरे यांनी आपल्या चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला सांगितले आहे  २३ मार्चला आघाडीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. रितसर जागा कोणाला असतील हे जाहीर केले जाईल असेही जयंत पाटील म्हणाले.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसनिवडणूकविजयसिंह मोहिते-पाटील