विशेष मुलाखत : यंत्रणांची सतर्कता, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळेच टळला मोठा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:08 AM2021-05-08T06:08:47+5:302021-05-08T06:09:43+5:30

विमानाचे चाक अचानक कसे काय निखळले, हा निष्काळजीपणा नव्हे का?

The vigilance of the systems, the pilot's foresight prevented a major accident | विशेष मुलाखत : यंत्रणांची सतर्कता, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळेच टळला मोठा अपघात

विशेष मुलाखत : यंत्रणांची सतर्कता, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळेच टळला मोठा अपघात

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीचक्राफ्ट किंग एअर सी -९० या चार्टड विमानाचे चाक निखळल्याने गुरुवारी रात्री त्याचे बेली लॅण्डिंग (पोटावर उतरविणे) करावे लागले. त्यासाठी मुंबई विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली; पण हा बाका प्रसंग उद्‌भवण्यामागील नेमके कारण काय, विमानाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले का, नागपूर विमानतळावरील सीआयएसएफ जवानाने चाक निखळल्याचे पाहिले नसते तर काय झाले असते, याबाबत हवाई वाहतूकतज्ज्ञ तथा मॅब एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक मंदार भारदे यांच्याशी केलेली चर्चा...

विमानाचे चाक अचानक कसे काय निखळले, हा निष्काळजीपणा नव्हे का?
उड्डाणावेळी विमानाचे चाक निखळून खाली पडण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी असे काही घडल्याचे ऐकिवात नाही. पूर्णतः तपासणी केल्याशिवाय विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर आणले जात नाही. कालच्या घटनेचा विचार करता विमानाच्या दुरुस्तीत निष्काळजीपणा (मेन्टेनन्स फेल्यूअर) दाखविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज काढता येईल. तपासात सर्व बाबी समोर येतील. त्याआधीच निष्कर्षापर्यंत पोहोचणे उचित ठरणार नाही.
हा प्रकार ‘त्या’ सीआयएसएफ जवानाने पाहिला नसता तर अनर्थ घडला नसता का?
नागपूर विमानतळावरील सीआयएसएफ जवानांनी उत्तम कामगिरी बजावली. परंतु, ही बाब त्यांच्या नजरेतून सुटली असती तरी धावपट्टीवरच्या कॅमेऱ्यात सर्वकाही टिपले गेले असते. विमानातून काहीतरी खाली पडल्याचे दिसताच यंत्रणा अलर्ट झाली असती. या ऑपरेशनचे सर्वाधिक श्रेय विमानतळावरील यंत्रणांना द्यावे लागेल. कारण एटीसी टॉवरमधील कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळेच विमानाचे सुखरूप लॅण्डिंग करणे शक्य झाले. एटीसीने दिलेल्या सूचनांनुसार पायलटने कृती केली. कॅप्टन केसरी सिंह यांच्या अनुभवाचाही मोठा फायदा झाला.
चार्टड विमान जुहूऐवजी मुंबई विमानतळावर का उतरवले, त्याचा फायदा कसा झाला?

जुहू विमानतळ लहान आकाराच्या विमानांसाठी राखीव असले तरी सूर्यास्तानंतर तेथे विमाने उतरवता येत नाहीत. अशावेळी मुंबई विमानतळाची मदत घ्यावी लागते. कालचे चार्टड विमान मुंबई विमानतळावर उतरवणे फायदेशीरच ठरले. कारण मोठी धावपट्टी, अग्निरोधक यंत्रणा आणि बचावकार्यासाठी तैनात असलेल्या पथकांच्या मदतीने कोणत्याही दुर्घटनेविना विमान पोटावर उतरविण्यात यश आले.
nमुलाखत : सुहास शेलार

‘त्या’ सीआयएसएफ जवानाला १० हजार रुपयांचे बक्षीस

मुंबई : बीचक्राफ्ट किंग एअर सी -९० या चार्टड विमानाचे चाक निखळल्याची बाब तत्काळ विमानतळावरील यंत्रणांच्या लक्षात आणून देत मोठा अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सीआयएसएफचे जवान रविकांत अवला यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

नागपूरवरून मुंबईच्या दिशेने उड्डाण घेणाऱ्या हवाई रुग्णवाहिकेचे चाक निखळून खाली पडल्याची बाब रविकांत यांच्या तीक्ष्ण नजरेने हरली. त्यांनी तत्काळ ही बाब नागपूर विमानतळावरली यंत्रणेच्या कानावर घातली. त्यानंतर सतर्क झालेल्या यंत्रणांनी मुंबई एटीसीला हा प्रकार सांगितला. विमानातील इंधन टाकी रिकामी करून बेली लँडिंग अर्थात विमान पोटावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यंत्रणांची सतर्कता आणि वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानाचे सुखरूप लँडिंग झाले; परंतु रविकांत यांनी वेळीच ही बाब पाहिली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.
हवालदार रविकांत अवला यांची सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठा लक्षात घेऊन सीआयएसएफचे महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी त्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तिपत्रक जाहीर केले, अशी माहिती सीआयएसएफकडून देण्यात आली.

Web Title: The vigilance of the systems, the pilot's foresight prevented a major accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.