Join us  

'शिवसेनेचं 'सूर्ययान' मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार, मुख्यमंत्री होणार!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 6:13 PM

'शिवसेनेचा हा छावा मैदानात उतरल्यानं आजपासून राज्याचं राजकारण पुन्हा 'मातोश्री'भोवती फिरणार!'

ठळक मुद्देवरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार आहेत.शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. 

मुंबईः काही दिवसांपूर्वी आपलं 'चांद्रयान' तांत्रिक बिघाडामुळे चंद्रावर उतरू शकलं नाही, पण शिवसेनेचं हे 'सूर्ययान' (आदित्य ठाकरे) मंत्रालयात सहाव्या मजल्यावर सुरक्षितपणे उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. 

शिवाजी महाराजांचा छावा राजकारणात आला, तेव्हा राजकारण आणि धर्मकारण बदलून गेलं होतं. आता शिवसेनेचा हा छावा मैदानात उतरल्यानं आजपासून राज्याचं राजकारण पुन्हा 'मातोश्री'भोवती फिरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आज या संदर्भात औपचारिक घोषणा केली. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते पहिलेच 'ठाकरे' आहेत. 

काय म्हणाले संजय राऊतः

>> ठाकरे परिवारातील कुणी निवडणूक लढवत नाही, हा एक अलिखित नियमच होऊन गेला आहे. पण, इतिहास घडवताना नियम बाजूला ठेवायचे असतात. 

>> ५० वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा राजकारण करणार नाही, निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. परंतु, समाजकारण करायचं तर समुद्रात उतरावंच लागेल, हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते खवळत्या समुद्रात उतरले. त्यांनी जे काम केलंय, ते आदित्य आणखी पुढे घेऊन जाईल. 

>> शिवसेनेतील तीन पिढ्यांसोबत आम्ही काम केलंय. आपल्या कुटुंबातील तरुणाने राज्याचं नेतृत्व करायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. 

>> महाराष्ट्र आमचा आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा द्यायचं काम केलं. महाराष्ट्रात ठिणगी पडली की देशात वणवा पेटतो. आज ठिणगी पडली आहे, याचा वणवा देशात पेटल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरेशिवसेनासंजय राऊतभाजपा